जळगावातील शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचे निधन, एकत्र पक्षांतराच्या आठवणींनी भुजबळ हळहळले

शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पहिले आमदार अशी हरीभाऊ आत्माराम महाजन यांची ओळख होती. (Jalgaon Shivsena Haribhau Mahajan Dies)

जळगावातील शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचे निधन, एकत्र पक्षांतराच्या आठवणींनी भुजबळ हळहळले

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन यांचे निधन झाले. एरंडोल विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले होते. त्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या साथीने महाजनांनी काँग्रेसप्रवेश केला होता. एकत्र पक्षांतराच्या आठवणींनी भुजबळही हळहळले. (Jalgaon Shivsena First MLA Haribhau Atmaram Mahajan Dies)

शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पहिले आमदार अशी हरीभाऊ आत्माराम महाजन यांची ओळख होती. त्यांचे काल (मंगळवारी) रात्री एक वाजताच्या सुमारास निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. हरीभाऊ महाजन यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भुजबळांसोबत पक्षांतर

हरीभाऊ आत्माराम महाजन हे 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार होते. नंतर मात्र छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी पक्षाची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हरीभाऊंच्या निधनामुळे धरणगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांना राजकीय वर्तुळातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

छगन भुजबळ हळहळले

“जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे दुःखद निधन झाले. मतदारसंघाच्या विकासासाठी हरिभाऊ महाजन यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेत असतांना ते माझे सहकारी आमदार होते. मी शिवसेनेमधून बाहेर पडलो तेव्हा ते भक्कमपणे माझ्यासोबत होते. त्यांच्या निधनाने एक धडाडीचे आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत आमदार महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !” अशा शब्दात छगन भुजबळ यांनी हरीभाऊ आत्माराम महाजन यांना श्रद्धांजली अर्पण केली.

(Jalgaon Shivsena First MLA Haribhau Atmaram Mahajan Dies)

Published On - 10:59 am, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI