गणेश नाईकांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली : जितेंद्र आव्हाड

गेल्या काही दिवसांपासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. अखेर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आणि सुरु असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर मात्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. नाईक कुटुंबावर त्यांनी जोरदार टीकाही केली आहे.  

गणेश नाईकांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली : जितेंद्र आव्हाड

ठाणे : गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे 2014 मध्येच ठरलं होतं. या संदर्भात मी वारंवार पक्षाला सांगत होतो, मात्र पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली. पण गेल्या पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली आणि पक्ष अडचणीत असताना उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचं काम करत आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा करु आणि त्याची सुरुवात नवी मुंबईतूनच करु, असा विश्वास व्यक्त करत आव्हाड (Jitendra Awhad) भावूक झाले.

गेल्या काही दिवसांपासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. अखेर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आणि सुरु असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर मात्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. नाईक कुटुंबावर त्यांनी जोरदार टीकाही केली आहे.

गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. या संदर्भात मी वारंवार पक्षाला माहिती देत होतो, मात्र माझं  दुर्दैव असं की, माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर पक्षानेही विश्वास ठेवला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उलट नाईक यांना नेहमी वरची बाजू पक्षाने दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

“नाईकांनी पक्ष संपवण्याचा विडा उचलला होता”

2014 मध्येच नाईक हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. परंतु पवार साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचं सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असं सांगितलं. मागील पाच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला खड्ड्यात घालण्याचं काम केलं. कल्याण-डोंबिवलीत सत्ता असताना त्या ठिकाणी एकही नगरसेवक नाही, हीच परिस्थिती भिवंडी आणि मीरा भाईंदरमध्येही होती. या सर्वाचे नेतृत्व कोण करीत होते, तर ते नाईकच होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवं होतं. मात्र राष्ट्रवादीला संपवण्याचा विडाच त्यांनी उचलला होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणोश नाईक यांच्या विरोधात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे वाट्टेल ते बोलत आहेत. नाईक यांना आम्ही स्वीकारणार नाही, असं भाजपचे अध्यक्ष बोलत आहेत. आता कुठे गेला नाईकांचा स्वाभिमान, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

“नाईकांनी नवी मुंबईपेक्षा कुटुंबाचा विकास जास्त केला”

राष्ट्रवादीने नाईक कुटुंबाला अख्खी नवी मुंबई दिली होती. सर्व महत्त्वाची पदं त्यांच्या घरात होती, असं असतानाही त्यांनी गद्दारी केली. नवी मुंबईचा विकास झाला हे मान्य जरी केलं तरी त्यात नाईकांनी आपल्या घराच्यांचाच विकास अधिक केल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला. हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. मात्र पक्षाकडूनच याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र आता हा पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरुवात नवी मुंबईतूनच करु असा, विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI