फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात

संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत, ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत. दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्त ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाह सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 16, 2025 | 10:52 AM

विधानसभा निवडणुका झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक मातब्बर नेते जात आहेत. राजन साळवी यांनीही ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवरच जोरदार निशाणा साधला आहे. फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल तर यांचं अख्खं दुकान खाली होईल. मी मागेही म्हणालो होतो की, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहही आमच्या पक्षात प्रवेश करतील. दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. ऑपरेशन टायगरचं आम्हाला काय सांगता? ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे. आम्हीही सत्तेत होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

सरकार आकडा लपवतंय

संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील चेंगराचेंगरीवरूनही हल्ला चढवला. दिल्लीला फ्लाट फॉर्म क्रमांक 14वर कुंभच्या निमित्ताने जी अव्यवस्था सरकारने दाखवली आहे. त्याचे बळी रेल्वे स्टेशनवर झाले. मृतांचा सरकारी आकडा ३० आहे. माझ्या माहिती प्रमाणे किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीने निमंत्रण दिलं जात आहे, जणू हा भाजपचाच सोहळा आहे. लोकांना भ्रमित केलं जातंय. तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था असल्याचं सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात तिथे असं काही नाही. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभात झाली नव्हती, असं राऊत म्हणाले.

100च्या वर लोक मेले

काल 50 कोटी लोक आले हे योगी सांगत होते. पण मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत किती मरण पावले? 7 हजाराच्यावर लोकं बेपत्ता आहेत. कुठे गेले 7 हजार लोक. एक तर चेंगराचेंगरीत मरण पावले असतील. दिल्लीत 100च्यावर लोक चेंगराचेंगरीत लोक मेले. मंत्री सांगत नव्हते. पण दिल्ली रेल्वेच्या अधिकाऱ्यानेच हा आकडा सांगितला. नाही तर हा आकडा कधीच बाहेर आला नसता, असंही त्यांनी सांगितलं.

व्यवस्थेचं फेल्युअर

तुम्ही कुंभची मार्केटिंग करत आहात. तुम्हाला माणुसकी नाही. दिल्लीत फ्लॅटफॉर्मवर चार दिवसापासून गर्दी आहे, हे तुम्हाला माहीत नाही. लोकं रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून लोक आत जात आहे. काय करतंय सरकार? काय करतात मोदी? राष्ट्रपती कुंभला गेले. मोदी कुंभला गेले. तुम्ही त्यांचे फोटो दाखवता. गरीब लोकं चिरडून मेले ते दाखवा ना, असा सवाल करतानाच दिल्लीतील चेंगराचेंगरीचा 18 अधिकृत आकडा आहे. म्हणजे 108 लोक मेले. सरकारचा आकडा खोटा आहे. व्यवस्थेचं हे फेल्युअर आहे, अशी टीका त्यांनी केली.