Kirit Somaiya : ‘सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच’, हनुमान जयंती दिनी सोमय्यांचा दावा, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: Apr 16, 2022 | 3:56 PM

किरीट सोमय्या यांनीही आपण हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर सोमय्या यांनी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच असा निर्धारही व्यक्त केलाय.

Kirit Somaiya : सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच, हनुमान जयंती दिनी सोमय्यांचा दावा, मुख्यमंत्र्यांवर निशाणा
उद्धव ठाकरे, किरीट सोमय्या
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे (Loudspeakers on Mosque) आणि हनुमान चालीसावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. भोंगे हटवण्यासाठी त्यांनी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर भोंगे हटवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिलेत. दुसरीकडे आज हनुमान जयंतीनिमित्त मनसे, भाजपसह महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांकडून हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलंय. या या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही आपण हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर सोमय्या यांनी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच असा निर्धारही व्यक्त केलाय.

‘लोकं आता संजय राऊतांवर हसू लागलेत’

किरीट सोमय्या म्हणाले की हनुमान जयंतीनिमित्त आज मंदिरात जाऊन देवाकडे शक्ती मागणार. मविआ सरकारच्या घोटाळ्याचं दहन करण्यासाठी, त्यांच्या घोटाळ्याची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार. महाविकास आघाडी सरकारमधील 24 घोटाळे बाहेर काढले आहेत. नवाब मलिकांपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंत सगळ्यांचे घोटाळे काढले. प्रवीण कलमे सध्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात येत जात असतो. लोकं आता संजय राऊतांवर हसू लागले आहेत. माझ्यावरील आरोप हे राऊतांचे नाही तर उद्धव ठाकरेंचे आहेत. 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप काल केला, परवा सामनात 3 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ही सगळी नौटंकी आहे, अशी टीका सोमय्या यांनी केलीय.

सोमवारी पोलिसांसमोर जाणार – सोमय्या

सोमय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्याचबरोबर राऊतांनी केलेल्या आरोपांबाबत बोलण्यासाठी आपण स्वत:च पोलिसांसमोर जाणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं होतं. ‘पाच घोटाळे काढले, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी नॉट रिचेबल झालो. त्याचा खुलासा लवकरच करणार आहे. उद्धव ठाकरे यांची स्ट्रॅटेजी आहे. आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही. काही करा पण एफआयआर करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिलाय. ठाकरे साहेब आता तुम्ही मेधा सोमय्यांच्या मागे लागलात. पण काही सापडणार नाही, आम्ही घाबरत नाही. 58 कोटीचा आकडा अचानक संजय राऊतांच्या डोक्यात कसा आला? संजय राऊतांकडे कोणताही पुरावा नाही. मी सोमवारी पोलिसांसमोर जाणार आणि विचारणार की तुम्हाला काय विचारायचं ते विचारा’, असं सोमय्या म्हणाले होते.

इतर बातम्या :

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा झटका

Kolhapur By Election Result 2022 : हिंदुत्व आमचा अजेंडा नाही, कोल्हापुरच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचं बंटी पाटलांना तीन मुद्यात उत्तर