आकडा आला! मोदींच्या परदेश दौऱ्यावर आतापर्यंत किती खर्च?

आकडा आला! मोदींच्या परदेश दौऱ्यावर आतापर्यंत किती खर्च?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्या ना कोणत्या कारणाने जगभरात चर्चा होते. मोदींची जगभ्रमंतीही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मोदींची परदेशवारीवर आता सातत्याने टीका होत आहे. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असल्याची टीका विरोधक करतात. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून आजपर्यंत मोदींनी एकूण 84 विदेश दौरे केले आहेत. मोदींच्या या दौऱ्याचा खर्चही अवाक् करणारा आहे. मोदींच्या साडेचार वर्षातील परदेश दौऱ्यांवर तब्बल 1600 कोटी रुपये खर्च झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच ही माहिती दिली.

राज्यसभेचे खासदार बिनोय विस्वम यांनी मोदींच्या विदेश दौऱ्यांवर आजवर किती खर्च झाला, असा लिखीत प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के सिंह यांनी ही माहिती दिली.

त्यापैकी बहुतेक खर्च हा एअर इंडिया वनची देखभाल आणि सुरक्षित हॉटलाईन सुरु करण्यासाठी आला. तर सुरक्षेचं कारण समोर करत इतर खर्चांबाबत कुठलीही माहिती दिली गेलेली नाही.

पंतप्रधान होताच मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा शेजारच्या भूतानचा दौरा केला. त्यानंतर ब्राझिल, नेपाळ, जपान असं करत अमेरिका आणि जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या.

सुरुवातीपासूनच त्यांच्या विदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर विरोधकांनी या विषयावरुन मोदींवर अनेक टीकाही केल्या.

मोदींचा विदेश दौरा खर्च

2014-15 : 220.38 कोटी रुपये

2015-16 : 220.48 कोटी रुपये

2016-17 : 376.67 कोटी रुपये

2017-18 : 341.77 कोटी रुपये

2018-19 : 423.88 कोटी रुपये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI