अहमदनगरमधील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा

हमदनगर कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. सध्या या जिल्ह्यात भाजपचे 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 आणि शिवसेनेचा एक आमदार आहे.

अहमदनगरमधील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:04 PM

अहमदनगर :  अहमदनगर कोणताही कानामात्रा नसलेला जिल्हा. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. सध्या या जिल्ह्यात भाजपचे 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 आणि शिवसेनेचा एक आमदार आहे.

हा जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन असा विविधतेने नटलेला आहे.  महत्वाचे म्हणजे सहकाराची पंढरी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई शिखर, हरिषचंद्र गड, चांदबिबीचा महाल, पट्टा किल्ला अशी ऐतिहासिक स्थळे तर शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी अशी धार्मिक तिर्थस्थळे या जिल्ह्यात आहेत.

आदर्शगाव संकल्पना राबवणारं समाजसेवक अण्णा हजारेंचं गाव राळेगणसिद्धी आणि सरपंच पोपटराव पवार यांचं आदर्शगाव हिवरेबाजारही याच जिल्ह्यात येतं. या जिल्ह्याने आजपर्यंत राज्याला अनेक मंत्री दिले आहेत. साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या मतदारसंघात आहे.

उलथापालथीचं राजकारण

नगर जिल्ह्यातील राजकारण सरळ नावाला विसंगत असंच आहे. इथे नेहमीच राजकीय उलथापालथी होत असतात. कोणत्याही निवडणुका आल्या की जिल्ह्यातील समीकरणे अगदी चुटकीसरशी बदलतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तेच पाहायला मिळालं. आगामी विधानसभा निवडणुकीतही तेच होण्याची शक्यता आहे.

12 मतदारसंघ

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या 6  तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले,  संगमनेर,  शिर्डी,  कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

मतदार                   पक्ष               आमदार 

राहुरी                    भाजप           शिवाजी कर्डीले

शेवगाव – पाथर्डी    भाजप          मोनिका राजळे

कर्जत – जामखेड   भाजप           राम शिंदे

पारनेर                  शिवसेना         विजय औटी

नगर शहर              राष्ट्रवादी      संग्राम जगताप

श्रीगोंदा                 राष्ट्रवादी       राहुल जगताप

संगमनेर             काँग्रेस             बाळासाहेब थोरात

शिर्डी                 भाजप               राधाकृष्ण विखे पाटील

कोपरगाव          भाजप                स्नेहलता कोल्हे

श्रीरामपूर           काँग्रेस               भाऊसाहेब कांबळे

नेवासा               भाजप                  बाळासाहेब मुरकुटे

अहमदनगर शहर – (Ahmednagar City Vidhan sabha)

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे इथे विद्यमान आमदार आहेत. अहमदनगर शहरात 2014 च्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वांचे उमेदवार होते. यात बाजी मारली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी. जगताप यांच्या आधी 25 वर्ष शिवसेनेचे अनिल राठोड हे आमदार होते. तर काँगेसकडून सत्यजित तांबे, भाजपकडून अॅड अभय आगरकर रिंगणात होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर यावेळी सर्व समीकरणे बदलली आहेत. कारण यंदा दिलीप गांधी यांचे तिकीट कापून डॉ. सुजय विखेंना तिकीट देण्यात आलं. सुजय विखेंनी विजयही मिळवला. त्यामुळे आता विखे पाटील सर्वच मतदारसंघात हस्तक्षेप करणार यात काही शंका नाही

पाथर्डी – शेवगाव (Pathardi Shevgaon Vidhan sabha)

या मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे (Monika Rajle) विद्यमान आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना फाईट दिली होती. त्यात घुलेंचा पराभव झाला.

कर्जत – जामखेड (Karjat Jamkhed Vidhan sabha)

कर्जत-जामखेड या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून मंत्री राम शिंदेंचं वर्चस्व आहे. विरोधकांना फार काही जादू करता आलेली नाही. मात्र, यंदा त्यांची लढाई शरद पवारांचे नातू रोहित पवारांसोबत असेल. त्यामुळे संपूर्ण राज्यांचं लक्ष या लढतीकडे असेल.

श्रीगोंदा – (Shrigonda Vidhan sabha )

राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप हे या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते हे प्रबळ नेते आहेत. पाचपुते हे 25 वर्षांपासून आमदार होते. विशेष म्हणजे पाचपुते हे आतापर्यंत वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यंदादेखील राहुल जगताप विरुद्ध बबनराव पाचपुते असाच सामना रंगणार यात शंका नाही.

राहुरी विधानसभा – (Rahuri Vidhan sabha)

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचं वर्चस्व आहे. नगरच्या राजकारणात कर्डिलेंना किंगमेकर म्हणून ओळखलं जातं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विखे आणि कर्डिले दुरावले गेले आहेत. कारण सुजय विखेंविरोधात कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप उभे होते. त्यामुळे त्यांनी जावायालाच मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत कर्डिलेंबाबत विखे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे.

पारनेर विधानसभा – (Parner Vidhan sabha)

पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय औटी प्रतिनिधीत्व करत आहेत. इथं भाजपला फारसा जनाधार नाही. विजय औटी गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता गाजवत आहेत. सध्या ते विधानसभेत उपसभापती देखील आहेत. त्यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार नाही. मात्र त्यांचे जुने कार्यकर्ते निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदा औटी विरुद्ध लंके असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

अकोले विधानसभा मतदारसंघ (Akole Vidhan sabha) 

अकोले विधानसभा मतदार संघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने अनुसूचित जातीकरिता (एसटी) राखीव असलेला मतदारसंघ. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, भंडारदरा धरण, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई , निसर्गाने नटलेला हरिषचंद्र गडाचा परिसर, अनेक ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरे , भंडारदरा, निळवंडे या मोठ्या धरणांसह अनेक छोट्या धरणांचा समूह आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका.

अकोले विधानसभा मतदारसंघ मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा गड होता. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पिचड राष्ट्रवादीसोबत गेले. तेव्हापासून आत्तापर्यंत अकोले राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. मधुकर पिचड यांनी अनेक वर्ष आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिलं. या काळात पिचड परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. ते पर्यटन स्थळांचा विकास, आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आग्रही होते. पिचडांनी तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मिती केली. अगस्ती सहकारी साखर कारखाना, अमृतसागर दूध संघ, नगरपरिषद तसेच अनेक ग्रामपंचायती पिचडांच्या अधिपत्याखाली आहेत. ही पिचडांची जमेची बाजू आहे.

2014 साली मधुकर पिचडांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यावर आमदारकीची जबाबदारी सोपवली. वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत 20 हजारांच्या मताधिक्याने शिवसेनेचे मधुकर तळपदे यांचा पराभव केला. भाजप शिवसेना स्वतंत्र लढल्याने झालेलं मताचं विभाजन पिचडांच्या पथ्यावर पडलं. नुकतंच पिचड पुत्रांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी नावाला शिल्लक राहिली आहे. दुसरीकडे भाजपचे अशोक भांगरे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे नेते आणि पंचायत समिती उपसभापती मारूती मेंघाळ यांनी एकत्र येत पिचडांविरोधात दंड थोपटले आहेत. डॉ. किरण लहामटे यांनी पिचडांचा भाजप प्रवेश होताच राष्ट्रवादीच्या गोटात जाण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी अजित पवारांची भेटदेखील घेतली. सध्या हे तिन्ही विरोधक पिचडांना एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे मनोमिलन झालं तर वैभव पिचडांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न –

  • पर्यटन विकास
  • तालुक्यातील रस्ते
  • आश्रम शाळेंची झालेली दुरावस्था
  • कळसूबाई , हरिषचंद्र गडाला जाणारे दयनिय रस्ते आणि अपुऱ्या सुविधा .
  • महत्वाच्या शहरांना जोडणारे मार्ग.
  • आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना.
  • रखडलेला बिताका प्रकल्प.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ –  (Sangamner Vidhan sabha) 

संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प., नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरातांचं वर्चस्व राहिलं आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला  म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.  ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत.  विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मतं घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला.

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्मी लागली. तिकडे विखे पाटील भाजपवासी झाले. थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता विखे पाटील थोरातांसमोर मोठं आव्हान उभ करु पाहत आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या संगमनेर वाऱ्या वाढल्या आहेत. थोरातांना शह देण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. विखे पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील त्याच्यामागे पक्षासह विखेंची ताकद उभी राहणार आहे. त्यामुळे यावेळी थोरातांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला राहिला आहे. शिवसेनेकडून जनार्दन आहेर यांचं नाव यंदाही चर्चेत आहे. मात्र, विखे पाटील कोणाच्या झोळीत माप टाकणार हे पाहणं सध्या तरी महत्वाचं ठरणार आहे.

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न – 

  • निळंवडे धरणाचे रखडलेले कालवे.
  • शहरातील अरुंद रस्ते
  • शहरातील नियोजनात्मक विकास
  • प्रकिया उद्योग

शिर्डी विधानसभा मतदार संघ – 

शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. मागील निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील मोदी लाटेतही 70 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता. विखे पाटील आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचं नाव सध्या चर्चेत आहे. सत्यजित तांबे यांनी शिर्डी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखतही दिली. शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांसमोर कडवं आव्हान देण्यासाठी तांबेंची निवड करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाल्याने विखेंचं पारड जड असल्याचं सांगण्यात येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. यावेळी भाजप शिवसेना युती झाली, तर ही जागा शिवसेनेकडे असल्याने विखे पाटील तिकीट मिळवण्यासाठी यातून कसा मार्ग काढतात ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. युती झाली नाही, तर मात्र विखेंसमोर शिवसेनेचंही मोठं आव्हान असेल.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न – 

  • श्री साईबाबा संस्थानातील 3 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी
  • शिर्डीतील वाढलेली गुन्हेगारी.
  • कोणतेही मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारीची वाढती समस्या.
  • गोदावरी पाटपाण्यासाठी कॅनॉल रुंदीकरण.
  • पाण्याअभावी उद्ध्वस्त झालेल्या फळबागा.
  • निळवंडे लाभधारकांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी अपूर्ण कालव्यांची कामे मार्गी लावणे.
  • शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन प्रकल्प.
  • डाळिंबाचं विक्रमी उत्पादन, मात्र कोणतेही प्रकिया उद्योग नाहीत.
  • शेतमालास शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिर्डी विमानतळ येथे सुविधा उपलब्ध करुन देणे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ – (Kopargaon Vidhan sabha)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांची परंपरागत लढत आहे. कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता राहिली. तिसरी शक्ती उदयास येऊ द्यायची नाही असं जणू समीकरणच बनलं आहे. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते. 35 वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळाले. 2004 साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीनदादा कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्याने अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. 2004 आणि 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले. त्यानंतर 2014 मध्ये अशोक काळेंनी निवृत्ती घेत त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांना उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला.

2014 च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी मुलाऐवजी त्यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकीटावर सौ. कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि 20 हजार मतांनी त्या विजयी झाल्या. मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्बवळावर लढले. मात्र यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीविरोधात भाजप शिवसेना युतीचा उमेदवार समोरासमोर असेल असं चित्र सध्या तरी आहे.

युतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे, तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. जर युती झाली नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे हे शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिला तर निवडणूक आणखीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न – 

  • कोपरगाव शहराची आर्थिकदृष्टया उद्धवस्त झालेली बाजारपेठ सक्षम करणे.
  • कोपरगाव एमआयडीसीत उद्योगाला आणि रोजगाराला चालना देणे.
  • शहराचा जटील झालेला पाणीप्रश्न.
  • निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळवून देणे, गोदावरी कॅनॉल रुंदीकरण.
  • शहरी, ग्रामीण भागातील रस्त्यांची दूरावस्था.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ – (Shrirampur Vidhan sabha)

काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे हे विद्यमान आमदार आहेत. श्रीरामपुर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका. जिल्हा मुख्यालयास लागणाऱ्या सर्व इमारती तालुक्यात आहेत. श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ (RTO) आणि अप्पर जिल्हा पोलीस कार्यालये आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था तसेच  रेल्वेची उपलब्धता आहे. अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा अशी मागणी सातत्याने पुढे येत असते.

अपवाद वगळता श्रीरामपूरचं राजकारण हे आदिक , मुरकुटे आणि ससाणे या गटांभोवतीच फिरत राहिलं आहे. दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं. जयंत ससाणे हे गोविंदराव आदिक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या तालमीत वाढलेले. 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाणे यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळचे उमेदवार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव केला. त्यानंतर ससाणे 2004 सालीही आमदार झाले. 2009 साली हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आणि ससाणे समर्थक भाऊसाहेब कांबळे सलग दोनवेळा आमदार झाले.

जयंत ससाणे यांच्या निधनानंतर राजकीय गणितं बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीत थोरातांनी ससाणे आणि विखे समर्थक भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. लोकसभा निवडणुकी दरम्यान डॉ. सुजय विखे भाजपात गेले. राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस ऐवजी शिर्डी लोकसभेत कांबळे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा जाहिर प्रचार केला. थोरातांनी जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष केलं होतं. मात्र 8 दिवसात विखेंच्या सांगण्यावरून करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि विखेंनी ससाणेंना जवळ करण्यात यश मिळवलं.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावर विखे पाटलांनी पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केलं आहे. भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच सदाशिव लोखंडे हे आपल्या मुलासाठी या मतदारसंघातून इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीची ताकदही या मतदारसंघात मोठी आहे. वंचितने जिल्ह्यातील सर्व 12 जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना 21 हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे हीच परिस्थिती विधानसभेत राहिली तर काँग्रेसची अडचण वाढू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरचे राजकारण शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याभोवती फिरत आहे. त्यामुळे यावेळी श्रीरामपूरकर कोणाच्या पारड्यात मते टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मतदार संघातील महत्वाचे प्रश्न – 

  • शेतीसाठी पाणी.
  • अहमदनगर जिल्हयाचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा.
  • वाढती गुन्हेगारीची समस्या.
  • रस्ते , ग्रामीण भागात पिण्याच पाणी.
  • श्रीरामपूर – नेवासा जोडणारा रस्ता चौपदरीकरण
  • श्रीरामपूर – बाभळेश्वर आणि श्रीरामपूर कोल्हार हा नगर मनमाड महामार्गाला जोडणारा रस्ता.

नेवासा विधानसभा मतदारसंघ – (Nevasa Vidhan sabha)

भाजपचे बाळासाहेब मुरकुटे हे विद्यमान आमदार आहेत.

नेवासा ही संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी. प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली. नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या  लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडे भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढताना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरली आहे.

गोदावरी , प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांचा संगमही याच तालुक्यात होतो ज्याला प्रवरासंगम म्हणून ओळखलं जातं. संत ज्ञानेश्वर मंदिर , मोहिनीराज मंदिर , देवगड देवस्थान तसेच शनिदेवाचं स्वयंभू स्थान असलेलं शनिशिंगणापूर अशी महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे. मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटी मुहूर्तमेढ यशवंतराव गडाख यांनीच रोवली. ग्रामपंचायत , जिल्हा परिषद , पंचायत समिती असो की स्थानिक संस्था यावर गडाखांचं प्राबल्य दिसून येतं. शनि शिंगणापूर देवस्थानावरही विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून गडाखांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लागली.

हा तालुका कायम विद्रोही विचाराचा आणि परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो. पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदारसंघ असताना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही. तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करुन वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं. त्यानंतर लंघे यांचा पराभव करुन 10 वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले. त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले यांचा पराभव करुन अपक्ष तुकाराम गडाख , 1995 साली तुकाराम गडाखांचा पराभव करुन पांडुरंग अभंग हे आमदार झाले. त्यनंतर 1999 आणि 2004 राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे दोन टर्म आमदार राहिले. 2009 साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आणि यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख मतदारसंघाचे प्रतिनीधी झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात गेलेले बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाखांवर चार हजार 652 मतांनी निसटता विजय प्राप्त केला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने शंकराव गडाख यांनी राष्ट्रवादीला निवडणुकीनंतर सोडचिठठी दिली. शेतकरी क्रांतीकारी पक्षाची स्थापना करत शंकरराव गडाख यांनी सवता सुभा मांडला. त्यामुळे नेवासा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव लंघे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीही विजयाची समिकरणे बिघडवू शकते. लोकसभा निवडणुकीत वंचितचे संजय सुखदान यांनी चांगली मते मिळवली होती. संजय सुखदान नेवासा येथील असल्याने त्यांचंही नाव चर्चेत आहे.

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न –

  • देहू आळंदी तीर्थक्षेत्र विकासाचं रखडलेलं काम.
  • 18 गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेच रखडलेलं काम.
  • सिंचनाचे रखडेलेल प्रश्न.
  • रस्ते आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न.
  • करोडो रुपयांचा अखर्चित निधी.
  • धार्मिक पर्यटन विकासाला चालना.
Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.