Kolhapur : भाजपचं ठरलं, सत्यजीत कदम यांना कोल्हापूर उत्तरची उमेदवारी, BJP खातं उघडणार?

Kolhapur : भाजपचं ठरलं, सत्यजीत कदम यांना कोल्हापूर उत्तरची उमेदवारी, BJP खातं उघडणार?
सत्यजीत कदम यांना कोल्हापूर उत्तरची उमेदवारी
Image Credit source: tv9

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

भूषण पाटील

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 18, 2022 | 9:38 PM

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. सत्यजीत कदम यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. तर, भाजपनं सत्यजित कदम (Satyajeet Kadam) आणि महेश जाधव (Mahesh Jadhav) यांचं नाव पाठवलं होतं. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं असून त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सत्यजित कदम यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी कदम यांचं नाव जाहीर केलं आहे. उमेदवारीसाठी सत्यजित कदम आणि महेश जाधव यांच्यात चुरस होती. मात्र, अखेर भाजपकडून सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सत्यजित कदम यांनी व्यक्त केला आहे.

सत्यजीत कदम कोण आहेत?

भाजपकडून कोल्हापूर उत्तरची उमेदवारी जाहीर करण्यात आलेले सत्यजीत कदम हे कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक असून ताराराणी आघाडीचे गटनेते राहिलेले आहेत. 2010 मध्ये कदम काँग्रेसकडून कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2011 आणि 2012 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून देखील काम केलं आहे. 2015 मध्ये कोल्हापूर महापनगरपालिकेमध्ये ताराराणी आघाडीचे गटनेते म्हणून कदम यांची निवड झाली होती.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्यजीत कदम काय म्हणाले?

भाजप पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवला. भाजप ची काम घराघरात पोहोचवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने केलेल्या कामाचा फायदा निवडणुकीत होईल. कोल्हापूरला वारंवार येणाऱ्या महापुरासह अन्य विषयावर काम करणार आहे. राज्यात महाविकास आघाडी दोन वर्षापूर्वी असली तरी कोल्हापुरात या आधीपासून ही आघाडी आहे. मात्र, संधी असूनही त्यांना अपेक्षित काम करता आलेले नाही. पालकमंत्री सतेज पाटील आम्ही केलेल्या आरोपांवर काही बोलत नाहीत. आम्ही वारंवार आवाहन करतोय समोरा समोर बसून उत्तर द्या पण दिलं तसं होत नाही. निवडणुकीय जे आरोप होतील त्याला प्रत्युत्तर दिल जाईल, असं देखील सत्यजीत कदम म्हणाले.

भाजप कोल्हापूरमध्ये खातं उघडणार?

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील एकाही जागेवर भाजपला विजय मिळवता आला नव्हता.त्यामुळं विरोधी पक्षांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत भाजप खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या: 

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

Kolhapur Assembly ByElection : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी होणार मतदान?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें