AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manohar Joshi Passes Away : महाराष्ट्राचे सर गेले… पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

Manohar Joshi Passes Away शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Manohar Joshi Passes Away : महाराष्ट्राचे सर गेले... पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
मनोहर जोशी Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2024 | 11:43 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मनोहर जोशींवर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोशींना ट्विट करत आदरांजली वाहिली आहे. “शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!” अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी नोहर जोशी जांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला- अजित पवार

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या.  विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली.

मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राचा कोहिनुर हरपला- अंबादास दानवे

दुःखद! महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले. शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा ‘शिवसेना काल-आज-उद्या’ या पुस्तक रुपात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्यही केले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अशा शब्दात अंबादास दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मनोहर जोशी बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिलेदार- सुप्रिया सुळे

माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्व बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉ मनोहर जोशी यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केले. अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्ष पदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. या दुःखद प्रसंगात आम्ही सर्वजण जोशी कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांची मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्त्व होते.

कुशल संघटक, उत्कृष्ट संसद पटू, अभ्यासू विरोधी पक्षनेते, उत्कृष्ट लोकसभा अध्यक्ष असा सार्थ लौकिक असलेल्या मनोहर जोशी यांनी प्रत्येक पदावर काम करताना आपला वेगळा असा ठसा उमटवला. कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. उत्कृष्ट वक्ते, मितभाषी, शिस्तप्रिय व राजकारणातील अजातशत्रू असे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे. जोशी हे लोकसभा अध्यक्ष असताना आपला त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला व तो कायम राहिला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे. नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते ज्यांनी लोकसेवेत वर्षे घालवली आणि महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशी जी यांना चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती. अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

जीवाला जीव देणारे शिवसैनिक निघून जातात हे फार दुर्दैवी- उद्धव ठाकरे

मनोहर जोशी मुख्यमंत्री होते,लोकसभा अध्यक्ष होते केंद्रीय मंत्री होते पण त्यापेक्षाही ते कट्टर शिवसैनिक होते. कोणत्याही पक्ष व कोणत्याही नेत्यांच्या आयुष्यात चढ उतार येत असतात मात्र कठीण परिस्थितीतसुद्धा मनोहर जोशी एकनिष्ठ राहिले, शिवसेना प्रमुखांसोबत ते राहिले. जीवाला जीव देणारे शिवसैनिक होते ते आपल्यातुन निघून जातात हे फार दुर्दैव आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.