इकडे स्क्रिप्टेड पोकळ ग्यान पाजळायचं… किरण मानेची PM मोदींच्या व्हिडीओवर टीका
Narendra Modi Video: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री व्हिडीओ शेअर करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून मराठमोळ्या अभिनेत्याने त्यांच्यावर टीका केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते दररोज रात्री इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते जंतर मंतर आंदोलनाबाबत बोलताना दिसले. त्यांनी आंदोलक मुलांना माफ केल्याचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या व्हिडीओची राजकीय तसेच चित्रपटसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा होते. आता यावर मराठी अभिनेता किरण मानने पोस्ट शेअर करत मोदींवर टीका केली आहे.
अभिनेता किरण माने हा कायमच चर्चेत असतो. तो नेहमीच सरकारवर टीका करत असतो. आता त्याने जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना सुनावले आहे.
वाचा: अभिजीत दीपकेचं करिअर उद्ध्वस्त? वडिलांच्या दाव्याने खळबळ
काय आहे किरण मानेची पोस्ट?
किरण मानेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “संसदेतून शेपूट घालून पळायचं आणि इन्स्टावर रील टाकून खोटा पुळका दाखवायचा…पत्रकार परिषदांना घाबरायचं आणि इकडं स्क्रिप्टेड पोकळ ग्यान पाजळायचं. ‘जेन झी’ के सामने ये पेंतरे नही चलते दद्दू. त्यामुळेच ते म्हणतात, ‘चाय बना …'” ही पोस्ट शेअर करत त्याने जेन झी इतनी नासमझ नहीं है दद्दू असे कॅप्शन दिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी किरण मानेला पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्याला चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
‘मित्रांनो, आज तर फक्त तुमच्याशीच बोलावंसं वाटत आहे. जंतर-मंतरवर जे काही घडलं, ते देशाने आणि जगाने पाहिलं. काही खोडकर मुलांनी अतिशय अश्लाघ्य आणि अशोभनीय भाषेत शिवीगाळ केली. अशा प्रकारची भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही. मला शिवीगाळ करण्यात आली, इतकंच नव्हे तर माझ्या दिवंगत आईबद्दलही अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्या सगळ्याचं स्वरूप अत्यंत दुर्दैवी होतं. पण आज मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. लहानपणी चुका होतात आणि त्या चुका सुधारण्याची संधीही लहानपणीच मिळते, हेच तर बालपणाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे समाजात जो संताप आहे, तो मी पूर्णपणे समजू शकतो. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, हा खरंच एक मोठा धक्का आहे. या मुलांना जवळ घेऊन योग्य मार्ग दाखवण्याची हीच वेळ आहे. ही दिशाभूल झालेली मुलं आहेत आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयांच्या फेऱ्या मारायला लावणं किंवा समाजात त्यांचा छळ करणं, यामुळे परिस्थिती बदलणार नाही. मी त्यांना माफ करू इच्छितो. समाजानेही माझी ही भूमिका स्वीकारावी, अशी माझी विनंती आहे. कारण माझ्या मनात एकच भावना आहे. कधी कधी आपल्या दातांखाली आपली जीभ येते आणि रक्तही निघतं. पण म्हणून आपण दात तोडत नाही, कारण दातही आपलेच असतात आणि जीभही आपलीच असते’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.