Beed : बीडच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ; दोन कट्टर विरोधक एकत्र येणार? नव्या समीकरणाची जोरदार चर्चा
बीडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. बीडमधील कट्टर राजकीय विरोधकांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

बीड राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बीड नगरपरिषदेत सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर मोठं राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता उभी राहण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी नगरसेवकांच्या एका गटाने नाराजीचा सूर आवळला आहे. त्यामुळे कधीही सत्तांतर होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बीडमधील अनेक वर्षांचे कट्टर राजकीय विरोधक क्षीरसागर बंधू एकत्र येणाच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बीड नगरपरिषदेत तत्कालीन महायुतीच्या पाठिंब्यावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली होती. आता सहा महिन्यातच अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. यामुळे सत्तेचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते योगेश क्षीरसागर यांनी नगरपरिषदेतील कारभारावरही नाराजी व्यक्त केली. त्यांनंतर बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असं विधान योगेश क्षीरसागर यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘अशी वेळ आल्यास आम्ही दोघे क्षीरसागर एकत्र बसण्यास तयार आहोत’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दोन्ही कट्टर राजकीय विरोधक येणार एकत्र?
बीडमधील दोन्ही कट्टर राजकीय विरोधकांच्या भूमिकेमुळे बीडच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हे समीकरण प्रत्यक्षात उतरल्यास नगरपरिषदेत सत्तांतर होण्याची शक्यताही अधिक बळावू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार विजय सिंह पंडित यांचं टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्यासमोर मोठं राजकीय आव्हान देखील उभं राहण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढील दोन आठवड्यात सत्ता समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. परंतु या राजकीय घडामोडींवर बीडमधील संबंधित नेते आणि नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे दोन आठवड्यात संबंधित नगरसेवक काय भूमिका काय घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
