डोंबिवलीत निळे रस्ते; अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल

डोंबिवलीतील प्रदूषणाच्या समस्येने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रासायनिक पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते गुलाबी होण्याची समस्या मिटते ना मिटतो तोच आता पुन्हा एकदा रसायन मिश्रित पाण्यामुळे येथील रस्ते निळे होऊ लागले आहेत. (mns mla raju patil warn officers over blue road in dombivli midc)

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण-डोंबिवली
  • Published On - 12:39 PM, 27 Nov 2020

डोंबिवली: डोंबिवलीतील प्रदूषणाच्या समस्येने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रासायनिक पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते गुलाबी होण्याची समस्या मिटते ना मिटतो तोच आता पुन्हा एकदा रसायन मिश्रित पाण्यामुळे येथील रस्ते निळे होऊ लागले आहेत. कारखान्यांमधून रस्त्यावरच हे निळं पाणी सोडण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवली असून त्यामुळे डोंबिवलीकरांची डोकेदुखी वाढली आहे. अधिकारीही या समस्येकडे लक्ष देत नसल्याने आता अधिकाऱ्यांना धुतल्यावरच हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. (mns mla raju patil warn officers over blue road in dombivli midc)

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून डोंबिवलीतील प्रदूषणाकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं लक्ष वेधलं आहे. डोंबिवली एमआयडीसीत प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नेहमी असते. 8 महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. स्वतः पाहणी करून प्रशासनाला आणि कंपनी मालकांना ताकीद देऊन सूचना केल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये कंपन्या सुरू झाल्यानंतर परत केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, असं राजू पाटील यांनी सांगितलं.

एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रकार घडत आहे. एमआयडीसी परिसरातील कल्याण-शीळ रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर निळ्या रंगाचे पाणी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रसायन मिश्रित पाण्यातून चालताना त्वचेचे आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

संबंधित बातम्या:

प्रदूषित पाण्यामुळे डोंबिवलीचे रस्ते गुलाबी, मुख्यमंत्र्यांच्या पाहणीपूर्वी कामगार कामाला लागले

डोंबिवलीच्या गुलाबी रस्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीबाहेर हलवणार

(mns mla raju patil warn officers over blue road in dombivli midc)