पुरुष गरोदर राहू शकत नाही; पण काहीजण वाटतात : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये राज गर्जना केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंं नाव न घेता टीका केली.

पुरुष गरोदर राहू शकत नाही; पण काहीजण वाटतात : राज ठाकरे

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये राज गर्जना केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंं नाव न घेता टीका केली. “जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी घडू शकतं नाही. या जगात फक्त पुरुष गरोदर राहू शकत नाही या व्यतिरिक्त सर्व काही होऊ शकतं. काही जण आजही वाटतात,” असे राज ठाकरे (Raj Thackeray Nashik) म्हणाले.

“मला तुमच्यासारखं राजकारण करता येत नाही. एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हे मला माहित आहे. आता घडू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही असं मला वाटतं. म्हणजे पुरुष गरोदर राहू शकत नाही या व्यक्तिरिक्त या जगात काहीही होऊ शकतं. काही जण आजही वाटतात. तुम्हाला कोण दिसंल हे मला माहिती नाही, जो दिसला त्यात आनंद घ्या.” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. इतकंच नव्हे राज ठाकरेंनी टरबूज, जॅकेट असाही उल्लेख केला.

“नाशिकमध्ये महापालिकेत सत्ता आल्यानंतर मी सर्व काही करुन दाखवलं. पण नंतर सत्ता गेली. नाशिकमध्ये झालेला माझ्या पराभव जिव्हारी लागला. नाशिक शहरात मी मनापासून काम केलं. जे आजपर्यंत तुम्हाला दिसलं नव्हतं. ते मी तुम्हाला दाखवलं,” असे राज ठाकरे म्हणाले. मात्र आता नाशिक शहर ओरबाडण्याचा प्रयत्न सुरु आहे असेही ते म्हणाले.

“हिंदुस्थान एरॉनटिक्स लिमिटेड, जिथे देशाची विमानं बनतात तिथला कामगार रडतोय कारण त्यांचा पगार होत नाही. हा कामगार देशोधडीला लागायची वेळ आली आहे. आता काय तर राफेलसारखी विमान आणली जातात. त्याचे कंत्राट अंबानीसारख्या कंपनीला दिलं जातं.” असेही राज ठाकरे म्हणाले.

तसेच शेतकरी आत्महत्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. “शेतकऱ्यांनो आत्महत्या कसली करताय, उलट ज्यांच्यामुळे ही वेळ आली आहे त्यांना मारा,” असेही राज ठाकरे (Raj Thackeray Nashik) म्हणाले.

“सह्याद्रीच्या रांगा पाहून उर भरून येतो, या रांगा सांगत असतात की मी जसा ताठ कण्याने उभा आहे, तसंच महाराष्ट्राने उभं रहायला हवं पण तोच महाराष्ट्र आज थंड बसलाय, महाराष्ट्राची सळसळती मनगटं कुठे गेली असा प्रश्न बहुदा सह्याद्रीच्या रांगांना देखील पडत असावा. लोकंच जर थंड राहणार असतील तर आम्ही निवडणुका लढण्याला आणि उमेदवार उभं करण्याला अर्थ काय?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थितीतांना विचारला.

तसेच “यापुढे लोकांना अडवून, रस्त्यावर ट्राफीक होईल अस काहीही करुन माझं स्वागत करु नका” असे आवाहनही त्यांनी महाराष्ट्रातील मनसैनिकांना केले.

शिवसेना भाजप ताटवाट्या घेऊन फिरतात, एक म्हणतोय 10 रुपयात जेवण देऊ, तर दुसरा म्हणतोय 5 रुपयात जेवण देऊ. महाराष्ट्राला काय भीक लागला आहे का? असा टोलाही त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला.

“आज यापुढे महाराष्ट्रावर एक हाती भगवा फडकवा. एकहाती सत्ता घेऊ म्हणणारे, युतीत आमची 5 वर्ष सडली म्हणणारे, पुन्हा युतीत का गेले? आणि पुन्हा भाजपने शिवसेनेला नाशिक पुण्यात एकही जागा दिली नाही. तरीही हे गप्प, इथल्या शिवसैनिकांनी काय करायचं?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारला.

“महाराष्ट्राला एका प्रबळ सक्षम विरोधी पक्षाची आज गरज आहे. एक असा विरोधी पक्ष जो कोणाही समोर घरंगळत जाणार नाही, कोणतीही सेटलमेंट करणार नाही. म्हणून मी तुमच्याकडे मागणं मागायला आलो आहे, की माझ्या पक्षाला या सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायची आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *