अशा परिस्थितीत मोदी पुन्हा पंतप्रधान होणे शक्य नाही : श्रीहरी अणे

अशा परिस्थितीत मोदी पुन्हा पंतप्रधान होणे शक्य नाही : श्रीहरी अणे

वर्धा : केंद्रिय मंत्री नितीन गडकरींचा पराभव भाजपला परवडणार नसल्याचं , वेगळ्या विदर्भाचे नेते श्रीहरी अणे यांनी सांगितलं. भाजपला तडजोडीची सत्ता स्थापन करण्याची वेळ आली, तर मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे मत अणे यांनी व्यक्त केलं. “नागपूर मतदारसंघातून भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे लोकसभेचे उमेदवार आहेत. गडकरी हे यशस्वी नेते आहेत. त्यामुळे सध्या संघाला नागपुरात गडकरींचा पराभव परवडण्यासारखा नाही. कारण, भाजपला तडजोडीची सत्ता स्थापन करण्याची वेळ आली, तर घटक पक्षांना मोदी चालणार नाहीत”, असे म्हणत अणेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

“घटक पक्षांना मोदी हे पंतप्रधान म्हणून चालणार नसल्याने नितीन गडकरींचे नाव संघातर्फे पंतप्रधान पदासाठी पुढे केलं जावू शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही”, असं मत श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलं. वर्धा येथे विदर्भ मंचातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मोदींनी देशाला खड्यात टाकलं”, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचंही अणेंनी समर्थन केलं. राज ठाकरे यांचं वक्तव्य खरं आहे. मात्र, राज ठाकरेंच्या या भूमिकेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला किती फायदा होणार, हे सांगू शकत नाही, असेही अणे म्हणाले. विदर्भ मंचच्या वतीने लोकसभेच्या 8 जागा लढवल्या जाणार आहेत. ही आमची सुरुवात आहे. पण, विधानसभेत आमची भूमिका निर्णायक असेल, असेही अणेंनी यावेळी स्पष्ट केलं.

Published On - 9:42 pm, Sun, 7 April 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI