सत्कार समारंभ भाजपच्या खासदाराचा, उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्याची

खासदार प्रताप पाटील यांच्या मूळ गावी कळका येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्कार समारंभ भाजपच्या खासदाराचा, उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्याची

नांदेड : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला. खासदार प्रताप पाटील यांच्या मूळ गावी कळका येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कालच राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप केला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नांदेडमध्ये हे चित्र दिसलंय. या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचं जाहीर केलंय. याच सत्कार सोहळ्यात महसूलमंत्र्यांनी चिखलीकर यांचं तोंडभरून कौतुक केलं.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाच पराभव झाला. 40148 मताधिक्य घेत भाजपने नांदेडची जागा जिंकली. अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुरुवातीपासूनच भाजपने रणनीती आखली होती. प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी देऊन या लढतीत आणखी चुरस निर्माण झाली. शिवाय अशोक चव्हाण यांना स्थानिक गटातटाच्या राजकारणाचाही फटका बसला.

काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरु केली असताना स्वबळावर लढण्याचा नेत्यांचा सूर असल्याचं बोललं जातंय. कारण, अनेक ठिकाणी काँग्रेसला राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तर काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीला मदत केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे ऐनविधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं दिसतंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI