माझा देश म्हणजे पवारांची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ नाही : उद्धव ठाकरे

माझा देश म्हणजे पवारांची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ नाही : उद्धव ठाकरे


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीच्या माध्यमातून घरातील उमेदवार उभे करत आहे. हा माझा भारत देश म्हणजे शरद पवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी ठाकरे यांनी हा सर्वसामान्य जनतेचा देश आहे. या देशातून सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी जायला हवेत. घराणेशाहीला येथे थारा नाही, असेही म्हटले. ते मावळ मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या चिंचवडच्या सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘विरोधकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. मात्र, श्रीरंग बारणे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादीची ही दादागिरी जनता मोडून काढणार आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे.’

‘हा प्रदेश डाकूंचा झाला आहे, डाकू नष्ट करायचे आहेत’

हिंदुत्वाचा तेजस्वी भगवा देशावर फडवकायचा आहे. देशाच्या संसदेत क्रांतिकारकांच्या भूमीतील खासदार असला पाहिजे. ही संतांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची भूमी आहे. हा प्रदेश डाकूंचा झाला आहे. विधानसभा, महापालिका निवडणुकीत त्यांना घालविले आहे. आता हळूहळू उरले सुरले डाकू नष्ट करायचे आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.

‘मोदी पंतप्रधान झाले  नाहीत तर देश अंधकारमय होईल’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भगव्यात देशाला ताकद देण्याची हिंमत आहे. मोदी पंतप्रधान झाले नाही, तर देश अंधकारमय होईल. त्यामुळे देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवाद संपविण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI