विरोधीपक्ष हताश-निराश, नेते जनतेला सोडून पळाले, परळीत नरेंद्र मोदींची टीका

हताश निराश झालेले विरोधीपक्षाचे नेते तुमचं चांगलं करु शकतील का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीवासियांना विचारला.

विरोधीपक्ष हताश-निराश, नेते जनतेला सोडून पळाले, परळीत नरेंद्र मोदींची टीका

परळी (बीड) : विरोधीपक्षाचे नेते तुम्हाला सोडून पळत आहेत. काँग्रेसमधील पक्षांतर्गत नाराजी संपत नाही. हताश निराश झालेले नेते तुमचं चांगलं करु शकतील का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीवासियांना (Narendra Modi Parali Rally) विचारला. भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी परळीत प्रचारसभा आयोजित केली होती.

महाराष्ट्रात सध्या भाजपचंच वातावरण आहे. इथे आमची कार्यशक्ती आहे, तर दुसरीकडे स्वार्थशक्ती. या लढतीमध्ये कार्यशक्तीच जिंकणार, अशा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी सभेपूर्वी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं.

वैजनाथांच्या पवित्र भूमीत आणि गोपीनाथरावांच्या कर्मभूमीत मी आलो आहे. परळीत येऊन वैजनाथाचं दर्शन न घेता कसं कोणी जाऊ शकतं. सर्वांना माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी नेहमीप्रमाणे भाषणाची मराठमोळी सुरुवात केली.

बीडने कायमच भाजपला आशीर्वाद दिला. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासारखे मित्र या बीडने मला दिले. आज दोघंही आपल्यासोबत नाहीत. पण देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यासारखे कार्यकर्ते मला दिले. यावेळी आधीचे सगळे विक्रम मोडतील, असा विश्वासही मोदींनी (Narendra Modi Parali Rally) बोलून दाखवला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. भाजपने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं, तेव्हा काँग्रेससह सर्वांनीच विरोध केला. ही लोकशाहीची हत्या असल्याची भाषा वापरली. विरोधकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देश देईल. पण पहिली संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. ती सोडू नका, असं आवाहन मोदींनी केलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय होईल माहित नाही. विरोधीपक्षाला चिंता आहे की भाजपचे कार्यकर्ते एवढी मेहनत का करत आहेत. कारण ते मनं जिंकतात आणि पक्षाला जिंकवतात. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. विरोधी पक्षाचे नेते तुम्हाला सोडून का पळत आहेत, हे तुम्हीच बघा, असंही मोदी म्हणाले.

केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू काश्मीरमधील वंचित, अल्पसंख्याकांना अधिकार मिळवून दिले. मात्र इथेही विरोधकांचा स्वार्थ जागा झाला. आम्ही राजकारणासाठी करत नाही. तर देशासाठी करत आहोत. विरोधक म्हणत आहेत की लोकशाही संपली, मला तुम्ही सांगा लोकशाही संपली आहे का?,” असा सवाल मोदींनी उपस्थितांना विचारला.

एक मोठा नेता म्हणाला लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसचा एक नेता म्हणाला, 370 हटवून काश्मीर गमावलं आहे. ही आपल्या विरोधकांची भाषा आहे. तुम्ही मला सांगा आपण काश्मीर गमावलं आहे का? तुम्हाला काश्मीरला जायचं असेल तर मला सांगा, मी व्यवस्था करतो, असंही मोदी म्हणाले.

विरोधक म्हणतात, जर काश्मीरमध्ये हिंदू असते, तर भाजपने असा निर्णय कधीच घेतला नसता. यातही विरोधक हिंदू मुस्लिम राजकारण करत आहे. या लोकांना शोधून-शोधून शिक्षा देणार की नाही? माझ्याकडे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांची यादीच आहे. ते सांगत बसलो तर 21 ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागेल. जेव्हा जेव्हा 370 चा विषय येईल, तेव्हा तेव्हा या लोकांचा हिशोब निघेल. देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना तुम्ही उत्तर द्याल. मला तुमच्यावर, तुमच्या देशभक्तीवर विश्वास आहे, असंही मोदी म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI