…. तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते, नवनीत राणांचा शिवसेनेवर हल्लाबोल

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana attacks Shiv Sena) यांनी लोकसभेतील निवेदनादरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचा घणाघात केला.

.... तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते, नवनीत राणांचा शिवसेनेवर हल्लाबोल


नवी दिल्ली : युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana attacks Shiv Sena) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana attacks Shiv Sena) यांनी लोकसभेतील निवेदनादरम्यान, महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचा घणाघात केला.

शिवसेनेच्या 2-3 खासदारांनी आज शेतकऱ्यांबाबत मुद्दे मांडले. मात्र महाराष्ट्रातील जनता त्यांना प्रश्न विचारु इच्छिते की सभागृहात तुम्ही शेतकऱ्यांबाबत बोलता, मात्र तुम्हाला युती म्हणून बहुमत दिलं असूनही तुम्ही आपल्या स्वार्थासाठी, लालसेसाठी सरकार स्थापन करु शकला नाहीत. जर शेतकऱ्यांसाठी इतकं प्रेम, इतकी सहानुभूती होती तर शिवसेनेने महाराष्ट्रात आधी सरकार स्थापन करायला हवं होतं. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या सर्वामागे ज्या कोणाचा सर्वात मोठा हात आहे, तो म्हणजे शिवसेनावाल्यांचा आहे”, असा हल्लाबोल नवनीत कौर राणा यांनी केला.

“शिवसेनेने स्वत:चा स्वार्थ, स्वत:च्या घराचा फायदा पाहिला. शेतकऱ्यांसाठी मदतीची भावना जर माझ्या मनात असेल, तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला पाठिंबा देऊ शकते”, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

 आज माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. मला शेतकऱ्यांबद्दल बोलायचं आहे. मला वेळ द्यावाच लागेल, असं नवनीत राणा लोकसभा अध्यक्षांना म्हणाल्या.

आज प्रत्येक तालुक्यात जेव्हा आम्ही फिरुन आलो, तेव्हा सर्व पीकाचं नुकसान झालं आहे. आज आमच्या राज्याला कोणीही मायबाप नाही. माझी केंद्राला विनंती आहे की आमच्या राज्याचं मायबाप आता केंद्र आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी, जेणेकरुन शेतकऱ्यांचं घर चालू शकेल” अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

रवी राणा यांचा भाजपला पाठिंबा

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा दिला आहे. रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला असला, तरी नवनीत कौर राणा या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत होत्या. त्यामुळे दोन्ही आघाडी आणि युती राणा यांच्या घरात आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI