राहुल गेठे बहुत उठ रहा है, हम बदला जरुरु लेंगे; नक्षलवाद्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला लाल शाईत धमकी

नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दौरा केला होता. या दौऱ्यानंतर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

राहुल गेठे बहुत उठ रहा है, हम बदला जरुरु लेंगे; नक्षलवाद्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला लाल शाईत धमकी
नक्षलवाद्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला लाल शाईत धमकी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 01, 2022 | 10:21 AM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गेल्या आठवड्यात गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. नक्षलवाद्यांचा इलाखा असलेल्या या परिसरात मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा केला होता. राज्यातील नक्षलवाद कमी होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला आठ दिवस होत नाही तोच नक्षलवादी (naxalite) पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्षलवाद्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला (SEO) धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल गेठे कार्यरत आहेत. त्यांना नक्षलवाद्यांनी ही धमकी दिली आहे. राहुल गेठे बहुत उठ रहा है. हमारा गडचिरोली मे बहुत नुकसान हो रहा है. हम हमारा बदला जरूर लेंगे, अशी धमकी देणारं पत्रच नक्षलवाद्यांनी राहुल गेठे यांना पाठवलं आहे.

या नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले पत्र पाठवून राहुल गेठे यांना धमकी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नक्षल्यांनी राहुल गेठे यांच्या सीबीडी बेलापूर येथील पत्त्यावर हे धमकावणारं पत्रं पाठवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दौरा केला होता. या दौऱ्यानंतर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सांभाळून राहावं अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील अशा स्वरूपाची ही धमकी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आल्याचं कळतं. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा करताच नक्षलवाद्यांनी ही धमकी देऊन आपण अजूनही सक्रिय असल्याचे संकेत तर दिले नाहीत ना? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.