“दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” अजितदादांनी रुसवा धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा

पहाटेच्या शपथविधीवरुन घोषणाबाजी केल्यापासून आतापर्यंत अजितदादा नितीन देशमुखांशी बोलले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केला

"दोन हाणा, पण मला आपलं म्हणा" अजितदादांनी रुसवा धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
नितीन देशमुख, अजित पवार

मुंबई : “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागितली. पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितिन हिंदुराव देशमुख (Nitin Deshmukh) यांच्यासोबत अजित पवार अद्यापही बोलले नाहीत. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला माफ करुन अबोला सोडावा, अशी गळ देशमुखांनी घातली आहे.

काय झालं होतं?

अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होता. या पहाटेच्या शपथविधीनंतर नितीन देशमुखांनी वाय बी चव्हाण येथे अजित दादांविरोधात घोषणाबाजी केली होती. नितीन देशमुख यांच्या भूमिकेबद्दल अजितदादांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

घोषणाबाजी केल्यापासून आतापर्यंत म्हणजे दीड वर्षांहून अधिक काळ अजितदादा देशमुखांशी अद्यापही बोलले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नितीन देशमुख यांनी दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. “दोन हाना, पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट” अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे.

कोण आहेत नितिन देशमुख?

नितिन देशमुख हे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. पवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बोलणारे भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडाळकर यांच्यावर देशमुख
नेहमीच तोंडसुख घेत आले आहेत.

काय आहेत जाहिराती?

आदरणीय दादा…
आम्ही अपराधी अपराधी
आम्हा नाही दृढ बुद्धी
तरी साहेबी पांघरले माझ्या चुकांवर पांघरुण
हात ठेवुनी मस्तकी आता द्यावा आशीर्वाद
अन् असावी आम्हावर मायेची पखरण

दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा…
तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा
23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या
दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली
दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे
पण दादा, आता सहन होत नाही
संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी
आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन
आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या..
एवढीच माफक अपेक्षा
– आपला कृपाभिलाषी नितीन हिंदुराव देशमुख

 

संबंधित बातम्या :

Ajit Pawar Birthday | अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजनेची घोषणा

गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?; अजितदादा जेव्हा भडकतात…

(NCP Leader Nitin Deshmukh apologies Ajit Pawar on his birthday through Newspaper ads)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI