‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ म्हणणारा आमदार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी

'माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील' म्हणणारा आमदार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Narhari Zirwal Deputy Speaker

अनिश बेंद्रे

|

Mar 14, 2020 | 4:45 PM

मुंबई : शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या गळ्यात विधानसभा उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. भाजप आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. (Narhari Zirwal Deputy Speaker)

नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी सापडले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.

शरद पवार साहेब हे माझं दैवत आहेत. त्यांनी मला पाचव्यांदा उमेदवारी दिली. आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी विश्वासघात करणार नाही, असं झिरवाळ म्हणाले होते.

कोण आहेत नरहरी झिरवाळ?

नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत नरहरी यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह सलग दोनवेळा निवडून येण्या बहुमान त्यांना मिळाला.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचं जागावाटपात ठरलं होतं. मात्र, उपाध्यक्षांची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नव्हती. (Narhari Zirwal Deputy Speaker)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें