राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह चित्रा वाघही भाजपात जाण्याची शक्यता

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 26, 2019 | 4:58 PM

तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती.

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह चित्रा वाघही भाजपात जाण्याची शक्यता

मुंबई : येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती.

अगोदर राष्ट्रवादीत असलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. कर्नाटकच्या आमदारांची जबाबदारी प्रसाद लाड यांनी यशस्वीपणे निभावल्यानंतर आणखी एक मोहिम फत्ते केल्याची माहिती आहे.

दरम्यान, फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर काँग्रेसचीही गळती सुरुच आहे. 30 जुलैला कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मधुकर पिचड यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही भाजपात जात असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोण आहेत पिचड पिता-पुत्र?

वैभव पिचड यांचे वडील मधुकर पिचड हे अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. विशेष म्हणजे मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अनेकदा त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मधुकर पिचड यांचाच मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे.

वैभव पिचड यांची मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया कळू शकली नाही. पण वैभव पिचड हे शिवसेना किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा त्यांच्या मतदारसंघातही गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.

मधुकर पिचड यांनी अकोल्यातून मुलाला उमेदवारी दिली होती. वैभव पिचड सध्या बंदीस्त कालव्यांसाठी आंदोलन करत आहेत. निळवंडेच्या कालव्यांना वैभव पिचड यांचा विरोध आहे.

उघड्या कालव्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनांसाठी मतदारसंघात सक्रिय असणारे वैभव पिचड आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत गेलाय.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शिवबंधन बांधलं होतं. आणखी अनेक आमदार भाजपात येणार असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून कायम केला जातोय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI