‘अमृताताई नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मानसिक स्वास्थ जपा’, नीलम गोऱ्हे यांचे चिमटे

शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवर अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधत "मानसिक स्वास्थ जपा", असा टोला लगावला आहे (Neelam Gorhe slams Amruta Fadnavis).

'अमृताताई नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मानसिक स्वास्थ जपा', नीलम गोऱ्हे यांचे चिमटे

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवर अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधत “मानसिक स्वास्थ जपा”, असा टोला लगावला आहे (Neelam Gorhe slams Amruta Fadnavis).

“अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा. मनस्वास्थ चांगले राहते”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली (Neelam Gorhe slams Amruta Fadnavis).

“शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम शववाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर मृता राहील. शिवसेनेची काळजी करु नका. आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे अयोग्य बरे का”, असा चिमटा नीलम यांनी काढला.

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या होत्या?

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केला आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद.., असंही अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

बिहार निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतला काही सेकंदाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. हाच व्हिडीओ ट्विट करत अमृता यांनीही शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत शिवसेनेची जोरदार खिल्ली उडवली आहे. “शिवसेनेने 50 जागा लढवूनही त्यांना भोपळाही फोडता आला नाही, असं सांगताना शिवसेना जरी खाली पडली तरी आपलं बोट वरती आहे असं सांगत फिरते”, अशा शब्दात फडणवीसांनी सेनेला चिमटे काढले आहेत. “शिवसेनेचं सगळ्याच जागांवर डिपॉझिट जप्त झालंय. काही जागा अशा आहेत की त्या जागांवर नोटा पेक्षाही सेनेला कमी मतं मिळाली आहेत”, असं सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा पहिल्यांदा बिहारमध्ये निवडून यायच्या. मात्र यंदा तर एकही जागा राष्ट्रवादीची निवडून आली नाही”, असा टोला त्यांनी शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला लगावला आहे. याचवरुन ‘शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारले’, असा मिश्किल टोला अमृता फडणवीस यांनी लगावलाय.

संबंधित बातम्या :

शिवसेनेचा ‘शवसेना’ उल्लेख, अमृता फडणवीसांचा पुन्हा बोचरा वार, बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल आभार

“देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”, बिहारमध्ये अनेक जागी नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला निलेश राणेंचा टोला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI