Paithan : आता सभेच्या गर्दीवरुनही राजकारण, खोतकरांना आठवण झाली नाथषष्ठीची..!

| Updated on: Sep 12, 2022 | 4:01 PM

सभेला नाउमेद करण्याचा विरोधकांचा डाव आहे. मुख्यमंत्री हे जनतेमधले असून गर्दी तर होणारच यामध्ये शंका नाही. केवळ कार्यकर्त्येच नाही शेतकरी, मजूर, कामगार असेही सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे नाथषष्ठीला जशी गर्दी होते तसेच आजचे चित्र असल्याचे खोतकर म्हणाले आहेत.

Paithan : आता सभेच्या गर्दीवरुनही राजकारण, खोतकरांना आठवण झाली नाथषष्ठीची..!
अर्जुन खोतकर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद :  (CM Ekanath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बहुचर्चित असलेली (Paithan Rally) पैठणची सभा आज होत आहे. मंत्री (Sandipan Bhumare) संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात ही जाहीर सभा होत असल्याने याला वेगळे महत्व आहे. तर याच सभेसाठी भुमरे यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे सभेला गर्दी होणार की नाही अशी चर्चा होत होती. पण पैठणमधील आजची गर्दी पाहून नाथषष्ठीला जशी भाविकांची गर्दी होते त्याचप्रमाणे आज पैठण नगरी दुमदुमली असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सभेतील नागरिकांच्या गर्दीवरुनही आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे.

आरोपांना प्रत्युत्तर, काय म्हणाले खोतकर?

अर्जुन खोतकर हे कट्टर शिवसैनिक होते. मात्र, मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून ते शिंदे गटासाठी संघटनात्मक काम करीत आहेत. तर आता मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले आहे. सभेला नाउमेद करण्याचा विरोधकांचा डाव आहे. मुख्यमंत्री हे जनतेमधले असून गर्दी तर होणारच यामध्ये शंका नाही. केवळ कार्यकर्त्येच नाही शेतकरी, मजूर, कामगार असेही सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे नाथषष्ठीला जशी गर्दी होते तसेच आजचे चित्र असल्याचे खोतकर म्हणाले आहेत.

तुलना करण्याची गरजच काय?

ज्या पैठणमध्ये मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्याच पैठण शहरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा घेत आहेत. त्यामुळे गर्दी अधिक कोणाची असा सवाल अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आला. मात्र, यावरुन खोतकरांची चांगलीच पंचायत झाली. एकेकाळी शिवसेनेशी एकनिष्ठ म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते ते खोतकर यांनी या प्रश्नाला उत्तर न देता गर्दीची तुलना करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

जागोजागी मुख्यमंत्र्यांचे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे हे औरंगाबादहू पैठणकडे मार्गस्थ होत असताना त्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. शिवाय शिंदे हे देखील गावोगावी थांबून ग्रामस्थांचे हार-तुरे हे स्विकारत होते. तर सोबत मंत्री संदीपान भुमरे हे देखील होते. ज्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून सभेच्या गर्दीवरुन चर्चा सुरु आहे. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्नच संदीपान भुमरे यांनी केला आहे.