आता माझी सटकली, फडणवीस तुमचा ओबीसी DNA कुठे गेला? ओबीसी नेत्याचा जळजळीत सवाल
कालचा निर्णय पहिल्यानंतर माझी सटकली आहे. तुमची सटकली आहे की नाही. आता यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. गरिबांच्या आरक्षणावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे.

सोलापूर | 28 जानेवारी 2024 : कोकणात कुणब्यांना मराठ्यांच्या घरासमोरून जायचे असेल तर त्यांना लेंगा घालता येत नव्हता. तर त्यांना लंगोट घालायला लागायची. त्यामुळे मराठ्यांनी आधी दहा वर्षे लंगोट घाला आणि मग ओबीसीत या. काल, कुणबी दाखल्याचा जीआर काढला. पण, 54 लाख सोडा एकही दाखला आम्ही पचू देणार नाही. सग्या सोयऱ्यासोबत गणगोत हा शब्द त्या जीआरमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण मराठ्यांना ओबीसीत आणण्याचे काम केले अशी टीका ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सरकारवर केली.
सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ओबीसी महासंघाची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. कालचा निर्णय पहिल्यानंतर माझी सटकली आहे. तुमची सटकली आहे की नाही. आता यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. गरिबांच्या आरक्षणावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आता आपल्याला यांना 2024 ला धक्का द्यावाच लागेल. सर्व ओबीसी आणि एससी एकत्र येतील तेव्हा यांचा सरपंचसुद्धा निवडून येणार नाही. सोलापूर जिल्ह्यात 5 आमदार आहेत. माढ्याचा एक खासदार आहे. या सर्वाना आपल्याला पाडायचे आहे. तुमच्याकडे हिरव्या रंगाची नोट येईल ती घ्यायची आणि घोटभर दिला तर तो ही घ्यायचा. घोट भर म्हणजे, चहा म्हणतोय मी. आता चहाचे अनेक ब्रँड आलेत ते घ्यायचे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे यावेळी व्यासपीठावर होते. त्याच्याकडे पाहून ते म्हणाले. ओबीसीचा पिवळा आणि आंबडेकर यांचा निळा असे दोन्ही आता एकत्र आले आहेत. आमच्या हक्काचे आरक्षण हिसकावून घेण्याचे पाप महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळे पुढे आम्ही दोघे मिळून त्यांना धक्का देणारच आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जरांगे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुलाल उधळला. वास्तविक पाहता काल महाराष्ट्रात तिसऱ्यांदा गुलाल उधळला. एकदा नारायण राणे समितीने दिलेले आरक्षण, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिल्यावर आणि काल पुन्हा तिसऱ्यांदा गुलाल उधळला. मात्र हा किती वेळ टिकतो हे पाहू. आम्हाला देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. देवेंद्र फडणवीस तर म्हणाले होते की आमचा DNA ओबीसी आहे. मग, आता कुठे गेला तुमचा DNA? अशी जळजळीत टीका प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केली.
