ओमराजे निंबाळकर कधी निर्णय घेणार? वेट अँड वॉच कशासाठी? मोठी अपडेट समोर; ठाकरे गटाला टेन्शन
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर बंडखोरीच्या चर्चेत आहेत. त्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र वडिलांच्या 20 जून रोजी लागणाऱ्या खून खटल्याच्या निकालानंतरच राजकीय निर्णय घेणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरे गटाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यास खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर सोयीचा निकाल मिळवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.

ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सहा खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचंही नाव आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप त्यांचे पत्ते खोलले नाहीत. पण बंड करणार नाही, याचा खुलासाही त्यांनी केला नाही. उलट उद्धव ठाकरेंसोबतच राहणार का? असा सवाल करण्यात आला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, एका गोष्टीसाठी ओमराजे निंबाळकर यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ती गोष्ट घडताच ओमराजे निंबाळकर आपला निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. येत्या 20 जून रोजी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल येणार आहे. कोर्टाने निकाल दिल्यानंतरच ओमराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत मिळत आहे. निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असं ओमराजे यांनी ठरवल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे दोन दिवसावर आलेल्या या निकालात काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तर अडचणीत वाढ
दरम्यान, ठाकरे गटाची संसदीय दलाची बैठक सुरू होत आहे. या बैठकीलाही ओमराजे उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे. ओमराजे हे कुटुंबासोबत पुण्यातील निवासस्थानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर जर मिटिंग आले नाही तर त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण मिटिंगसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे व्हीपचं उल्लंघन करणं ओमराजेंना भार पडणार आहे, अशी माहिती मिळत आहे. तर येत्या 20 जून रोजी भूमिका मांडणार असल्याचं ओमराजे यांनी कळवलं आहे.
राऊतांचे आरोप काय?
खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ओमराजे यांच्या वडिलांचा निकाल राखून ठेवला आहे. सोयीचा निकाल लावून घेण्यासाठी त्यांना शिंदे सेनेत येण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपाचंही ओमराजे यांनी खंडन केलेलं नाही. मीडियासमोर येऊनही ओमराजेंनी त्यावर खुलासा केला नाही. त्यामुळे पाणी कुठं तरी मुरतंय, असं बोललं जात आहे.
