दिल्लीत मोदींची धन्यवाद रॅली, विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Rally) यांना धन्यवाद देण्यासाठी भाजपच्या वतीने रामलीला मैदानावर रॅलीचं आय़ोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक येतील, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

दिल्लीत मोदींची धन्यवाद रॅली, विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाची राजधानी दिल्लीच्या 1,734 अवैध वसाहती नियमित केल्या आहेत. याबाबत आज (22 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Rally) यांना धन्यवाद देण्यासाठी भाजपच्या वतीने रामलीला मैदानावर रॅलीचं आय़ोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक येतील, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. या रॅलीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे (PM Thank You Rally).

दिल्लीत अवैध वसाहतींना नियमित केल्याने जवळपास 40 लाख लोकांना त्यांचा मालकी हक्क मिळू शकणार आहे. या रॅलीमध्ये 7 खासदार, 281 मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांवर समर्थकांना जमवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार अशी माहिती आहे. त्यासाठी ही वातावारण निर्मिती असल्याचं बोललं जात आहे.

जामियामध्ये फेल दिल्ली पोलीस रामलीला मैदानावर पास होणार?

गेल्या रविवारी (15 डिसेंबर) दिल्लीच्या जामिया विद्यापीठात झालेल्या मारहाणीनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीचा प्रत्येक स्तरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर आता या रविवारी (22 डिसेंबर)दिल्ली पोलिसांसमोर आणखी एक मोठं आव्हान आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य रॅली. यावेळी सुरक्षा-सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.

‘पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका’

काही दहशतवादी गट रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीदरम्यान पंतप्रधानांना लक्ष्य करु शकतात, अशी माहिती आहे. याप्रकरणी गुप्तचर संस्थांनी विशेष संरक्षण गट आणि दिल्ली पोलिसांना माहिती दिली आहे. केंद्रीय संस्थांनी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ब्ल्यू बुकमध्ये असलेल्या सूचना पूर्णपणे अंमलात आणण्याच्या सूचना सुरक्षा संस्थांना देण्यात आल्या आहेत.

रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना देशात एकत्र करण्यात आलं आहे, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिली. त्यामुळे योग्य ती सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच, गर्दीला नियंत्रित करण्यासाठी गुप्तचर संस्थांनी दिल्ली पोलिसांना अलर्ट दिला आहे. रामलीला मैदानावर सुरक्षेची जबाबदारी विशेष सुरक्षा गट (एसपीजी) आणि दिल्ली पोलिसांवर असेल.

Published On - 10:38 am, Sun, 22 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI