EXCLUSIVE : पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, फडणवीस म्हणाले, दादा जोखीम पत्करतोय, दादा म्हणाले माझ्यासोबत 28 आमदार

देवेंद्र फडणवीस-अजित पवार (Devendra Fadnavis – Ajit Pawar) यांच्या शपथविधीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:27 PM, 25 Nov 2020
priyam gandhi mody book trading power

मुंबई : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार (Devendra Fadnavis – Ajit Pawar) यांच्या शपथविधीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या शपथविधीला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकात (Priyam Gandhi mody book trading power) फडणवीसांचे प्रश्न आणि अजित पवारांची उत्तर जशीच्या तशी छापली आहेत. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेण्यासाठी कसे तयार झाले? शरद पवारांचं मत काय होतं? अजित पवारांनी त्यावेळी कोण कोणत्या आमदारांची नावं घेतली होती? हा सर्व तपशील या पुस्तकात आहे.

ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?

राष्ट्रवादीचा एक ज्येष्ठ नेता हा भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शाह, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचा एक बडा नेताही हजर होता.

या बैठकीनंतरची ही गोष्ट. राष्ट्रवादीचा बडा नेता फडणवीसांच्या कार्यालयात जातो आणि ‘पवारांनी आपली भूमिका बदलली असल्याचं’ सांगतो. ‘या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील ही शक्यता फार धुसर आहे. पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचं बरंच वय झालंय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचं पर्व आहे,’ असं हा बडा नेता फडणवीसांना सांगतो.

‘पवारांना आपली प्रतिष्ठा जपायची आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व राजकीय मित्राला दिलेला शब्द पाळला तरच पवारसाहेबांची प्रतिष्ठा टिकू शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेल पक्ष उत्सुक आहे.’

दुपार, वर्षा बंगला :

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोनवर एक त्रोटक निरोप धाडला : ‘दादा, भाजप-राष्ट्रवादीच्या डीलला पवारसाहेबांचा पाठिंबा बहुधा मिळणार नाही असं दिसतंय. सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजतंय. नेमकं काय चाललंय ?’

अजित पवारांनी फडणवीसांना उत्तर पाठवलं : ‘तुम्ही म्हणताहात ते खरं आहे. चित भी मेरी पट भी मेरा, असं पवारांचं एकंदर धोरण दिसतंय. त्यांना वाटतंय की, सेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील. अशी संधी कोण बरं सोडेल ?’

‘तुमची भूमिका काय आहे ?’ फडणवीसांनी अजित पवारांना विचारलं.

‘अजूनपर्यंत मी भाजप आणि तुमच्याबरोबर आहे,’ अजित पवारांनी उत्तर दिलं.

‘तुम्ही पुरेसं संख्याबळ जमवू शकाल ?’ फडणवीसांनी विचारलं.

‘या घडीला माझ्याकडे २८ आमदार आहेत. मी जे म्हणेन ते ते करतील. तुमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू,’ अजित पवार म्हणाले.

‘कोण आहेत ते आमदार ?’ फडणवीसांचा प्रश्न.

‘सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय तेरा आणखी,’ अजित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्याकडच्या आमदारांची यादी वाचून दाखवली.

‘या आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जावं, असं तुम्हांला वाटतं काय ? ते बाहेर सुरक्षित राहतील,’ फडणवीस म्हणाले.

‘नाही, नाही. इथेच थांबू या. इतर आमदारांबरोबर राहिले तर कदाचित ते इतरांचं मनपरिवर्तन करू शकतील. ह्यासाठी व्यूहरचना करावी लागेल. मी माझ्या विश्वासू सहकाऱ्यांशी याविषयी बोलतो. चार आमदारांचा एक गट करू. माझ्या विश्वासातले २८ आमदार ग्रुप लीडर म्हणून काम करतील. उरलेल्या एक-एक दोन आमदारांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचं काम या २८ आमदारांवर सोपवलं जाईल,’ अजित पवार म्हणाले.

‘हूं…दादा, सगळं चोख पार पडलं पाहिजे. आपण फार मोठी जोखीम पत्करतो आहोत हे तुम्हांला चांगलं ठाऊक आहे. होय ना ?’ फडणवीस म्हणाले.
———

‘एनसीपी तुमच्या संपर्कात आहे ही आतली खबर शिवसेनेला लागली आहे. सगळे अधिकार पवारांच्या हाती सुपुर्द करायला सेना एका पायावर तयार आहे.’

‘पक्षातल्या इतर नेत्यांचं काय मत आहे ?’ फडणवीसांनी विचारलं.

‘देवेंद्रजी, बरेच आमदार पवारसाहेबांच्या निर्णयाला पाठिंबा देतील. सेनेला पाठिंबा देऊन पवारसाहेब चूक करताहेत, असं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं–म्हणजे आमचं मत आहे. सुप्रियाताईंना वगळून.

परंतु, पवारसाहेब आमचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत,’ राष्ट्रवादीचा सदस्य म्हणाला. थोडं थांबून तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही जे ठरवलंय ते प्रत्यक्षात खरं करून दाखवू शकेल असा एकच माणूस म्हणजे अजितदादा.

सेनेचं नेतृत्व असलेल्या युती सरकारला अजितदादांचा ठाम विरोध आहे. दादा राजकारणात अजून दहा-एक वर्षं असणार आहेत. कदाचित जास्त. सेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचं नुकसान होईल आणि आपल्या (म्हणजे अजितदादांच्या) कारकिर्दीलाही अपाय होईल, असं त्यांचं मत आहे.’

‘शिवाय, या सगळ्याला एक कौटुंबिक बाजूदेखील आहे. अजितदादांच्या मुलाला, पार्थला बाजूला सारलं जातंय आणि रोहितला बळ दिलं जातंय. तुम्हांला तर हे सगळं ठाऊक आहेच. दुसरं, दादांचं सुप्रियाताईंशी शीत-युद्ध (cold war) सुरू आहे. यामुळे आगीत तेल ओतलं जातंय.

संबंधित बातम्या 

PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो