
Prithviraj Chavan : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. दुसरीकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी आघाडी, युतीचं गणित जुळवलं जात आहे. राज्यात लवकर मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संभाव्य युतीनंतर आता महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडलेला आहे. आता यावरच भाष्य करत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आमची आघाडी ही कायम असेल. पण एखाद्या पक्षाने पोटआघाडी केली तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं चव्हाण यांनी म्हटलंय.
पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात संभाव्य युती झाली तर महाविकास आघाडीची काय स्थिती असेल? अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, आमची आघाडी ही राष्ट्रीय आघाडी आहे. ती कायम राहील. इंडिया आघाडीच्या एखाद्या घटकपक्षाने निवडणुकीसाठी अन्य पक्षाशी युती केली तर तो त्यांचा अधिकार आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.
तसेच, आमची आघाडी ही उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षांसोबत आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्या पक्षांनी एखाद्या पक्षाशी पोटआघाडी केली किंवा आपल्या जागांपैकी इतर कोणाला दिल्या तर तो त्यांचा विषय आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा चालू झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलणार आहे. त्यामुळे राज्यात विरोधकांची महाविकास आघाडी कायम राहील का? महाविकास आघाडी कायम राहिली तर त्यात राज ठाकरेंना स्थान असेल का? स्थानिक स्वराज्य संस्थेत जागावाटप नेमके कसे केले जाईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी पोटआघाड्या करणे हा ज्या-त्या पक्षाचा अधिकार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.