
खरंतर महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असला पाहिजे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उलटं चित्र दिसलं. महायुतीमध्येच अंतर्गत स्पर्धा, संघर्ष, वाद दिसून आले. शिवसेना विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्र) विरुद्ध भाजप असा सामना काही ठिकाणी झाला. स्थानिक पातळीवरील समीकरणांनुसार या आघाड्या, युत्या आकाराला आलेल्या. नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात बड्या नेत्यांनी राज्यात एकत्र सत्तेवर असूनही परस्परांवर जोरदार टीका केली. खासकरुन रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना हा संघर्ष सर्वाधिक झाला.
भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विरुद्ध सुनील तटकरे असा हा सामना होता. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात हा संघर्ष इतका तीव्र आहे की, अजून रायगड पालकमंत्री मिळालेला नाही. कारण शिंदेंच्या तिन्ही आमदारांचा पालकमंत्रीपद तटकरे कुटुंबाकडे द्यायला कडाडून विरोध आहे. तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या मंत्री आहेत. भरत गोगावले यांच्याकडे सुद्धा मंत्रीपद आहे. या स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे रायगड जिल्ह्याला अजून पालकमंत्री मिळालेला नाही.
तटकरे यांनीच दानवेंना पाठवल्याचा आरोप
महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनकाळात उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्बचा एक व्हिडिओ टि्वट केला. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ कॉल त्यांनी शेअर केला. त्यात नोटांची बंडलं आणि अजून एक लाल टी शर्ट घातलेली अस्पष्ट व्यक्ती दिसत होती. महेंद्र दळवी आणि शिंदे सेनेतील नेत्यांनी, ही व्हिडिओ क्लिप मॉर्फ असून ती अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच दानवेंना पाठवल्याचा आरोप केला.
वाद वाढायला नको खबरदारी घ्यावी
आता भरत गोगावले, उदय सामंत आणि अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी-शिवसेना सुरू असलेला संघर्ष आता थांबायला हवा अशी अजित पवारांनी भूमिका मांडली. रायगड प्रकरणी अजित पवारांनी थेट भरत गोगावले आणि मंत्री सामंत यांच्याशी चर्चा केली. बैठकीत दोन्ही पक्षाकडून संबंध ताणले जाऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली. सामंत-गोगावले यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे यांच्याशी देखील अजित पवार बोलले. चर्चेत, वाद वाढायला नको खबरदारी घ्यावी अशी सूचना करण्यात आली. अजित पवारांकडून अनौपचारिक चर्चेत माहिती देण्यात आली.