राज ठाकरेंचा झंझावात पुन्हा सुरु, 10 मेपासून दुष्काळ दौरा

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:16 PM, 5 May 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा न करताही, दहा प्रचारसभा घेऊन अवघं राजकारण ढवळून काढलं. राज ठाकरे यांनी विश्रांती न घेता, लोकसभेचा निकाल लागण्याआधीच त्यांचा पुन्हा झंझावात सुरु करणार आहेत. येत्या 10 मेपासून राज ठाकरे राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघणार आहेत.

पुढल्या आठवड्यात म्हणजे 10 मेपासून राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर जातील. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत.

याबरोबरच राज्यभरात फिरुन राज ठाकरे पक्षाचं (मनसे) जाळं नव्यानं बांधणार आहेत. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या राज्य दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यात राज ठाकरे राज्यातली मनसेची ताकद जाणून घेणार असून, स्थानिक कार्यकर्ते, पक्ष संघटन आणि सामान्य नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर देणार आहेत.

एकंदरीत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेचा एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, ‘मोदी-शाह मुक्त भारत’ अशी घोषणा देत राज ठाकरे यांनी राज्यभरात दहा प्रचारसभा घेतल्या आणि भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं.

राज ठाकरे यांच्या प्रचारसभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यामुळे आता राज ठाकरे लोकसभा निकालाच्या आधीच विधानसभेच्या कामाला लागल्याने, येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या तयारीने राज ठाकरे उतरतील, हे निश्चित.