Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंची रामदास कदमांवरील नाराजी दूर? 14 मे च्या सभेला बोलावणं, पण कदम सभेला जाणार नाहीत?

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंची रामदास कदमांवरील नाराजी दूर? 14 मे च्या सभेला बोलावणं, पण कदम सभेला जाणार नाहीत?
रामदास कदम, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9

14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिलीय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेसाठी बोलावणं आलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.

मनोज लेले

| Edited By: सागर जोशी

May 12, 2022 | 7:39 PM

रत्नागिरी : एका ऑडिओ क्लिपमुळे (Audio Clip) मागील काही दिवसांपासून ‘मातोश्री’च्या वक्रदृष्टीमुळे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) राज्याच्या राजकारणापासून दुरावले गेल्याचं पाहायला मिळत होतं. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक आरोप करणाऱ्या रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कदम यांच्यावर नाराज होते. मात्र, आता ही नाराजी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिलीय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेसाठी बोलावणं आलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे. मात्र, आपण त्या सभेला जाणार नसल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.

सभेचं निमंंत्रण पण कदम उपस्थित राहणार नाहीत!

रामदास कदम यांच्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचं प्रकाशन आज पार पडलं. त्यावेळी बोलताना कदम म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेचं बोलावणं आलंय. मात्र, या सभेला मी उपस्थित राहणार नाही. त्यानंतर मी स्वत: उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. गावातील देवळात सप्ताहाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण सभेला येणार नसल्याचा निरोपही आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचं कदम यांनी सांगितलंय.

कदमांकडून एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंचं कौतुक

रामदास कदम यांनी यावेळी अजून एक मोठं वक्तव्य केलंय. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत की एकनाथ शिंदे आहेत हे कळत नाही. एकनाथ शिंदे यांचं काम चांगलं आहे. तुम्ही तर मुख्यमंत्री होता होता राहिले. थोडी गडबड झाली. पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात रामदास कदमांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलंय.

भगवा झेंडा मरेपर्यंत माझ्या खांद्यावर असेल- कदम

साधारण महिनाभरापूर्वी रामदास कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. राऊत आणि कदमांच्या भेटीनं त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती समोर आली नव्हती. त्यावेळी बोलताना कदम म्हणाले होते की, ‘माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या. शिवसेना प्रमुखांचा, शिवसेनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मरेपर्यंत माझ्या खांद्यावर असेल. त्याची साथ मी कदापि सोडणार नाही. मी स्वत:ला डाग लागू देणार नाही. पक्षाशी बेईमानी करणार नाही’.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें