“जशी पवारांकडून माढ्याची जागा काढून घेतली, तशी पंढरपूरची जागा पुन्हा मिळू देणार नाही”

| Updated on: Apr 06, 2021 | 10:34 AM

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. (Ranjeet Singh Naik Nimbalkar Sharad Pawar)

जशी पवारांकडून माढ्याची जागा काढून घेतली, तशी पंढरपूरची जागा पुन्हा मिळू देणार नाही
sharad-pawar
Follow us on

पंढरपूर : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही” अशी गर्जना भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeet Singh Naik Nimbalkar) यांनी केली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते तळ ठोकून आहेत. (Ranjeet Singh Naik Nimbalkar on Sharad Pawar ahead of Pandharpur By Poll)

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती. त्याबद्दल प्रशांत परिचारक यांनाही कळवलं होतं, मात्र राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या पत्नीला संधी दिली असती, तर भाजपची बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी होती. परंतु राष्ट्रवादीला ही भावना कळली नसल्याचा आरोपही निंबाळकरांनी केला.

माढा मतदारसंघात नेमकं काय झालं होतं?

2009 मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तर 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी ही जागा जिंकली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोहिते-पाटलांनी भाजपचा हात हाती धरला. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते.

त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत पवारांनी त्यावेळी व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. त्यामुळे नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु पार्थ यांच्या पदरी यश पडले नाही.

निंबाळकरांचा विरोधकांना इशारा

दरम्यान, विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही, अशा कडक शब्दात निंबाळकरांनी विरोधकांना सुनावले.

मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहे. 2014 च्या आधी पंढरपूर कसे होते, त्यानंतर 2014 पासून भाजपाच्या काळामध्ये रस्त्यांसह विविध विकास कामे झाली आहेत. पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त असल्याचा दावा नाईक-निंबाळकर यांनी केला. (Ranjeet Singh Naik Nimbalkar on Sharad Pawar ahead of Pandharpur By Poll)

अजित पवारांवर टीका

दिवंगत आमदार भारत भालके आपले चांगले मित्र होते. 2014 पासून 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी आपलाही वाटा आहे. राष्ट्रवादी गावच्या पाणी योजनेमध्ये दोन टीएमसी पाणी देतो, असे सांगत आहेत. मात्र राज्य सरकारच्या बजेटमध्ये योजनेसाठी एक रुपयाची तरतूद केली असती तर भारत नानांना श्रद्धांजली ठरली असती, अशी टीका निंबाळकर यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता “बारामती येथील नेते पाणी चोर आहेत. पंढरपूरला येणारे पाणी बारामतीला चोरुन नेले आहे. त्यामुळे हे पाणी चोर पंढरपूरला पाणी देणार का” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या :

संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक, पंढरपुरात चर्चेला उधाण

पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?

(Ranjeet Singh Naik Nimbalkar on Sharad Pawar ahead of Pandharpur By Poll)