प्रचंड यंत्रणा राबवूनही मिशन बारामती फेल, पवारांचा बालेकिल्ला अभेद्य कशामुळे?

  • नाविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 21:45 PM, 29 May 2019
प्रचंड यंत्रणा राबवूनही मिशन बारामती फेल, पवारांचा बालेकिल्ला अभेद्य कशामुळे?

बारामती : कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचीच असा निर्धार केलेल्या भाजपला या मतदारसंघात सपशेल अपयश आलं. मागील निवडणुकीत केवळ 69 हजारांनी जिंकलेल्या सुप्रिया सुळे यांना या निवडणुकीत विजय तर मिळालाच, मात्र त्यांचं मताधिक्यही वाढलं. त्यामुळे बारामती जिंकण्यासाठी भाजपने केलेले प्रयत्न, पवारांविरोधात निर्माण केलेलं वातावरण आणि शेवटपर्यंत निकालाबाबत केलेल्या चर्चा फोलच ठरल्या. विशेष म्हणजे केंद्रापासून राज्यापर्यंतच्या भाजप नेत्यांनी बारामतीत पवार कुटुंबीयांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र निकालात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत बारामती हा पवारांचाच बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं.

भाजपचा उमेदवार जाहीर होण्याआधीच सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात

बारामती म्हटलं की शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षे या मतदारसंघावर शरद पवार यांचा दबदबा राहिलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, धनगर आरक्षणाचा मुद्दा असतानाही सुप्रिया सुळे या 70 हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळून त्यांनी महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. तर जानकर यांना अनपेक्षितपणे दौंड, खडकवासला या विधानसभा मतदारसंघामधून आघाडी मिळाली होती. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण याबाबतच अनेक दिवस शिक्कामोर्तब होत नव्हतं. तत्पूर्वीच सुप्रिया सुळे यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती.

चंद्रकांत पाटील बारामतीत तळ ठोकून

भाजपकडून ऐनवेळी पवारांच्या नातेवाईक असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हे स्वत: निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना कमळ या चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आली. जानकर यांना ही निवडणूक स्वत:च्या राष्ट्रीय समाज पक्षाची चिन्हावर लढायची असल्याने त्यांनी शेवटपर्यंत बारामतीसाठी प्रयत्न केले. मात्र भाजपकडून त्यांच्या उमेदवारीबाबत विचार केला गेला नाही. उलट त्यांच्याच पक्षातील एकमेव आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. पुण्यात झालेल्या भाजप मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार केला होता. त्यामुळे कांचन कुल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून मोठी यंत्रणा या मतदारसंघात उतरवण्यात आली. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीतच ठिय्या मांडला.

भाजपकडून दिग्गजांच्या बारामतीत सभा

इतकंच नव्हे तर भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी नेत्यांच्या सभाही या मतदारसंघात घेण्यात आल्या. पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत या सर्वच नेत्यांनी मतदारांना परिवर्तनासाठी साद घातली. मागील निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळालं, त्या ठिकाणीही विशेष यंत्रणा राबवून मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. एकूणच पवार कुटुंबीयांना पर्यायाने राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजपकडून करण्यात आले. मात्र निवडणुक निकालानंतर हे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं स्पष्ट झालं.

राष्ट्रवादीकडून प्रभावी प्रचार

दुसरीकडे भाजप सरकारबद्दल लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा व्हावा यासाठी राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले गेले. मागील निवडणुकीतील धनगर आरक्षणाचा मुद्दा, शेतकर्‍यांचे प्रश्न, सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या समस्या आदी मुद्दे घेत राष्ट्रवादीने भाजप सरकारवर हल्लाबोल केला. मागील निवडणुकीत कमी झालेलं मताधिक्य लक्षात घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीपूर्वीच विविध भागांमध्ये दौरे करत मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. त्याचवेळी इंदापूर, पुरंदर आणि भोर या काँग्रेसची ताकद असलेल्या मतदारसंघातील नेत्यांशी असलेले मतभेदही संपवण्यात आले. त्यामुळं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडी घेतली. त्याचे परिणाम या निवडणुकीत पहायला मिळाले. बारामतीसह इंदापूर, भोर आणि पुरंदर या तालुक्यांनी सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बारामती लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत 21 लाख 12 हजार 408 मतदारांपैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रचंड यंत्रणा राबवली. त्यांच्याकडून पवारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या अभेद्य गडाला छेद द्यायचाच ही भूमिका भाजपची राहिली. त्याचवेळी राष्ट्रवादीने मात्र संयम ठेवत विकासासह भाजपच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवला. त्याचीच पावती म्हणून सुप्रिया सुळे यांना विजय तर मिळालाच मात्र त्यांच्या मताधिक्यातही लक्षणीय वाढ झाल्याने बारामती हा पवारांचाच बालेकिल्ला असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं.