AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे कर्म तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते, अर्णव प्रकरणावरुन शिवसेनेचा टोला

शिवसेनेनं सामना या वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात याबाबतची टीका केली आहे. (Saamana Rokhthok criticism on Arnav Goswami) 

तुमचे कर्म तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते, अर्णव प्रकरणावरुन शिवसेनेचा टोला
| Updated on: Nov 15, 2020 | 8:14 AM
Share

मुंबई : ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतूच आहे. तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते! असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेनं सामना या वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात याबाबतची टीका केली आहे. (Saamana Rokhthok criticism on Arnav Goswami)

शिवसेनेच्या ‘रोखठोक’ सदरात नेमकं काय म्हटलं?

दिवाळी फिकी जाईल असे वाटत होते. प्रत्यक्षात रस्ते आणि दुकानांत झुंबड आहे. दिव्यांचा उत्सव झगमगतो आहे. राम दिग्विजयी होऊन अयोध्येत आले तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता उत्सव साजरा करूया!

दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असे वाटले होते. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची वगैरे पर्वा न करता लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुधा कोरोना चिरडून मरेल असा विनोद त्यावर काही लोकांनी केला. कोरोना आहे तसाच आहे. लोकांचे चिरडणे सुरू आहे. दिवाळी सण साजरा करावा असे सगळय़ांनाच वाटते. ही परंपरा आहे. आजची दिवाळी व दीडशे वर्षांपूर्वीची दिवाळी यात फरक आहे. गोविंद नारायण माडगावकर यांचे मुंबईचे वर्णन करणारे पुस्तक 1861 साली प्रसिद्ध झाले. त्यात मुंबईतील दिवाळी सणाचे वर्णन केले आहे ते असे.

‘‘दीपवाळी ह्या सणाचा मुंबईत उत्साह होतो, तसा पृथ्वीवर कोठेच होत नसेल. हे मंडण सतत पांच दिवसपर्यंत असते आणि हा पाहावयास लोक देशोदेशांतून येत असतात. अनेक तऱहांची चित्रे, आरसे, हांडय़ा व झुंबर लावून पेढय़ा व दिवाणखाने इतके शृंगारितात की, त्यापुढे श्रीमंतांचा आरसेमहाल कांहीच नाही. किल्ल्यांत, बाजारात व सर्व मुंबईभर रस्तोरस्ती व गल्लोगल्लीत हांडय़ा व गलासें पेटलेली असून जिकडेतिकडे गाडय़ांची गर्दी असत्ये. प्रत्येक पेढीत अरास होत्ये तिचे वर्णन केले तितके थोडेच. ज्या दिवशी पेढीपूजन होते व नव्या चोपडय़ा होतात त्यादिवशी तर कोटांत आणि मार्पिटांत गाडय़ांची आणि मणुष्यांची इतकी गर्दी होते की, नदीच्या लोटासारिखी गाडय़ांची हार लागलेली असते. या दिवसात गुजराथी, घोडेवाले एकत्र जमून एक तऱहेवाईक पोशाख करून पायांत चाळ व कमरेत घागऱया बांधून हातात दोन दोन काठय़ा घेऊन गृहस्थाच्या घरी जाऊन नाचत असतात, व गाणी हाणतात. ह्यांस रुपया आठ आणे पोस्त द्यावे पडते. काही मोठा सणवार आला ह्मणजे शिपाई, चाकर वगैरे लोकांस आठ-चार आणे बक्षीस द्यावे पडतात, त्यास पोस्त म्हणतात. बलिप्रतिपदेचे दिवशी गवळी लोकांचा मोठा सण, हय़ा दिवशी म्हशींस व गाईंस शृंगारून पंचवाद्यांनिशी रस्तोरस्ती व इष्टमित्रांच्या घरोघर फिरवितात. मग त्यांस पंचारतीची ओवाळणी होत्ये. कोणी कोणी इंग्रजी बाजादेखील लावितात.’’

अयोध्येत दिवाळी

प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही. चौदा वर्षे वनवास भोगून रावणावर विजय मिळवून राम अयोध्येत परत आल्याची आनंदवार्ता हनुमंताने भरताला सांगितली. त्यावेळी भरत म्हणतो, ‘‘मनुष्य जिवंत असला तर त्याला शंभर वर्षांनी का होईना आनंद मिळतोच!’’ याचा अनुभव अनेकदा येतच असतो. एका अर्थाने भरताने जगाला आणि समाजाला संदेश दिला आहे की, ‘‘दुःखे कोसळली तरी ती सहन करावीत. खचून जाऊन आत्महत्येचे टोक गाठू नये. कारण केव्हा ना केव्हा दुःख संपतेच. पहाट होते. आपण खचून जाऊन जीवनाचाच नाश केला तर सुखाचे दिवस कसे येऊ शकतील?’’ हे ‘रामायणा’चेच सार आहे. रामाला वनवास घडला. निशादराज मंथरेला आणि पैकयीला दोष देऊ लागला. त्यावेळी लक्ष्मण त्याला म्हणाला, ‘‘बाबा रे, तिला का दोष देतोस? सुख किंवा दुःख देणारे दुसरे कोणी नसते. इतर कोणामुळे तरी आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. तसेच ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतूच आहे.’’ तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते! देव काय करणार? (Saamana Rokhthok criticism on Arnav Goswami)

‘रामायण’ आणि ‘महाभारता’तून अनेक सण-उत्सवांचा उगम झाला. रामाचा विजय म्हणजे दिवाळी. पांडवांचा विजय म्हणजे दसरा. ही सर्व माणसेच होती. महाभारतात एक सुंदर विचार आला आहे- ‘देव काही एखाद्या गुराख्याप्रमाणे हातात दंड घेऊन कोणाचे रक्षण करीत नाहीत, तर ज्याचे रक्षण करण्याची ते इच्छा करतात त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धी देतात. मला हेसुद्धा फारसे पटत नाही. ज्ञान, बुद्धी, विचार कमवावे लागतात. हे कमवणे आता कमी झाले आहे. एका वृत्तवाहिनीचा प्रमुख गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल तुरुंगात गेला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो सुटून तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा ‘भारतमाता की जय’ वगैरे घोषणा देऊ लागला. येथे भारतमातेचा काय संबंध? ज्या न्यायमूर्ती महाशयांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या सबबीखाली त्याची सुटका केली, त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणे हे समजण्यासारखे आहे. येथे भारतमाता, राष्ट्रभक्ती वगैरेचा संबंध काय? ज्या तरुण उद्योजकाने छळास कंटाळून आत्महत्या केली, त्या अन्वय नाईक यांचीही भारतमाता होतीच व अन्वय नाईकच्या पत्नीचीही भारतमाता आहे. भारतमातेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा उत्सव फक्त एका व्यक्तीपुरता नसतो. म्हणून रामाच्या विजयाच्या उत्सवाने दिवाळीचे स्वरूप प्राप्त केले. कोरोनाची पर्वा न करता, आर्थिक मंदी, तंगीची फिकीर न करता लोकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. भारतमाता त्या सगळय़ांचीच आहे!

दीपोत्सव!

अनेक संकटांशी सामना करीत सध्या दिवाळी साजरी होत आहे हे उत्तम. गर्दी आहे, कोरोनाचे काय? हा प्रश्न गंभीर आहे, पण दीपोत्सवास टाळून पुढचे पाऊल कसे टाकायचे? ‘मनुष्य स्वभावतः उत्सवप्रिय आहे’ हे कालिदासाचे सुभाषित पृथ्वीवरील यच्चयावत मानव समाजास लागू पडणारे व त्रिकालाबाधित आहे. ज्यांना रानटी म्हणतात त्या शेकडो वर्षे जंगलात वृक्ष, पशूंबरोबर वाढणाऱया मानव समूहातसुद्धा जर सण किंवा उत्सव साजरे होत असतात, तर ज्यांना काही धर्म आहे, दीर्घकालीन पूर्वपरंपरा आहे, त्यांच्यात सण, उत्सव पाळले जाणे स्वाभाविक आहे. बिहारच्या निवडणुकीतील राजकीय पीछेहाट, पराभवसुद्धा ‘सण’ म्हणून साजरे केले जात आहेत. मग मुंबई, महाराष्ट्रातील लोकांनी सण, परंपरांचे पालन का करू नये? कोरोनामुळे मुंबई-पुण्याचा दीपोत्सव थोडा फिका पडला असेल, पण उत्सवातला उत्साह कायम दिसतो आहे. लक्ष्मीपूजनाचा संबंध व्यापाऱयांशी येतो, पण सामान्य माणूसही आपल्या फाटक्या खिशाची पर्वा न करता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करतो. बेसुमार गर्दीतून तो आपल्या भाग्याची प्रकाशकिरणे शोधतो व पुढे जातो. दिव्यांनी फुललेले व फुलांनी बहरलेले रस्ते म्हणजेच श्रीमंती नसते. महागाई, मंदी, कोरोनासारख्या संकटांशी लढून पुढे जाण्याचा उत्साह हाच सामान्यांचा उत्सव ठरतो. रामाने अयोध्येत प्रवेश केला तेव्हा उत्सव साजरा केला.

संपूर्ण अयोध्या दिवे आणि फुलांनी सजली, नटली. दिवाळी म्हणजे तेजपर्वाची सुरुवात. ती श्रीरामाच्या वनवास समाप्तीने, अयोध्येतील आगमनाने झाली. देश आज अंधारलेला आहे. नवे तेजपर्व सुरू होईल अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे! चला, जशी आली आहे तशीच दिवाळी साजरी करूया! (Saamana Rokhthok criticism on Arnav Goswami)

संबंधित बातम्या : 

संजय राऊत वाढदिवस साजरा करणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.