डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य; सामनाच्या अग्रलेखातून राऊत बरसले

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर शरसंधान साधलं आहे.

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य; सामनाच्या अग्रलेखातून राऊत बरसले
Sanjay raut

मुंबई :  शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावलेली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला केला. आज त्याच पद्धतीने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तोफ डागून राऊतांनी भाजप नेतृत्वाला काही सवाल विचारले आहेत. तसंच ‘कर नाही त्याला जर कशाला?,’ असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांचा राऊतांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतयाय. (Sanjay Raut Attacked bjp Through Saamana Editorial over Ed Notice)

‘ईडी’ च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपालनियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे, असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. ‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलं आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, अशा शब्दात राऊत भाजपवर बरसले.

ईडीच्या वतीने भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू आहे. ‘ईडी’ची नोटीस वगैरे आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. नव्हे, कायद्याचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत, हा कळीचा प्रश्न राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केलाय.

देशात फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल, असा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय.

‘चंद्रकांत पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या?, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.

2020 चे ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे ‘ईडी’च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे, असंही राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

त्यामुळे ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकविण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे, असा हल्ला अग्रलेखातून भाजपवर करण्यात आलाय. (Sanjay Raut Attacked bjp Through Saamana Editorial over Ed Notice)

हे ही वाचा

ED ने वर्षा राऊत यांना बजावलं समन्स; 5 जानेवारी 2021ला हजर राहण्याचे आदेश

पंतप्रधान मोदी किती तास झोपतात? इतके अ‍ॅक्टिव्ह आणि एनर्जेटिक कसे?

हसन मुश्रीफांचा जनता दरबार, गावखेड्यातील समस्यांचं ग्रामविकासमंत्र्यांच्या पुढे गाऱ्हाणे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI