भाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारलं : शरद पवार

भाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारलं : शरद पवार

केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं आहे. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, असं म्हणत शरद पवारांनी  (Sharad Pawar) मोदी सरकारवर घणाघात केला.

Nupur Chilkulwar

|

Dec 23, 2019 | 6:24 PM

मुंबई : झारखंड निवडणुकीचे निकाल (Jharkhand Assembly Election Results 2019) पाहता देशातील जनता भाजपविरोधी (BJP) असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं आहे. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, असं म्हणत शरद पवारांनी  (Sharad Pawar) मोदी सरकारवर घणाघात केला (Sharad Pawar on BJP Jharkhand Situation).

शरद पवारांनी आज (23 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी झारखंड विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलं, तसेच पुढे काय घडेल त्याचा अंदाजही वर्तवला. यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधत, भाजपला आता उतरती कळा लागल्याची टीका केली.

“झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाच राज्यातून भाजप हद्दपार झाली आहे. यामुळे देशातील इतर राज्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सरळ दिसत आहे की, भाजपला आता उतरती कळा लागली आहे आणि आता ही उतरण थांबू शकणार नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपला सुनावलं.

“सुधारित नागरिकत्व कायद्याचा प्रभाव झारखंड निवडणुकांमध्ये दिसतो आहे. देशात CAA किंवा NRC सारखे कायदे आणण्याची आवश्यकता नव्हती. या मुद्यांवरून समाजात आणि देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत आहे”, अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली.

“पंतप्रधान म्हणाले की CAA आणि NRC या विषयांवर मंत्रिमंडळात फारशी चर्चा झाली नाही. मात्र, गृहमंत्री स्पष्ट म्हणाले होते की NRC आणणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही याचा उल्लेख होता. यानंतरही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान म्हणतात, त्यामुळे ते जे सांगतात आणि वस्तुस्थिती यात तफावत आहे”, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

“देशात अनेक राज्यात, शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. हे आंदोलनं अशीच सुरू राहिली तर माझी खात्री आहे की, योग्य वेळी लोक झारखंड सारखेच उत्तर भाजपला देतील. आता लोकचळवळ सुरू होत आहे, संघर्षाची तीव्रता वाढते आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

झारखंड विधानसभा निकाल 2019

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपने महाराष्ट्रानंतर आणखी एक राज्य गमावल्याचं चित्र आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी या आघाडीने मुसंडी मारत एकूण 81 जागांपैकी जवळपास 45 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला संध्याकाळी 4.30 पर्यंत 26 जागांवरच आघाडी घेता आली. त्यामुळे भाजपने आणखी एक राज्य गमावल्याचं चित्र आहे. 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान 5 टप्प्यांमध्ये मतदान झाले होते.

Sharad Pawar on Jharkhand Assembly Election Results

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें