“मला मुख्यमंत्रिपद द्या…” अजित पवारांच्या मागणीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले “भाजपमध्ये…”
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला आहे. '
Jayant Patil On Ajit Pawar Demand : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच सध्या महायुती आणि महाविकासआघाडीत मुख्यमंत्री कोण होणार यावरुन वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
जयंत पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपमधील अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे अजित पवार अशी काही मागणी करतील असं मला वाटत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
“भाजपमधील अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं”
“निवडणुकीच्या आधी अजित पवार अशी मागणी करतील, असं मला तरी वाटत नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे ते अशी काही मागणी करतील असं मला तरी वाटत नाही. ही बातमी अशीच कोणीतरी पसरवलेली असेल. कारण भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमधील अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे अजित पवार अशी काही मागणी करतील असं मला वाटत नाही”, असे जयंत पाटील म्हणाले.
“आता काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही”
“बिहारच्या प्रयोगाबद्दल मी बोलणं सध्या तरी योग्य नाही. त्यांच्या आघाडीबद्दल बोलणं मला तरी योग्य वाटत नाही. घटना घडल्यानंतर यावर बोलू शकतो. आता काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही”, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना अजित पवार आणि अमित शाहा यांची मुंबई विमानतळावर बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. “महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे. राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह यांच्यापुढे ठेवला. यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही चर्चा झाली.