शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’वर भेट, कोणत्या विषयांवर चर्चा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर दोघी नेत्यांची भेट झाली (Sharad Pawar meet Uddhav Thackery at Varsha Bungalow).

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:56 PM, 9 Nov 2020
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा'वर भेट, कोणत्या विषयांवर चर्चा?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट झाली (Sharad Pawar meet Uddhav Thackery at Varsha Bungalow). दोघी नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाला मदत म्हणून रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपये देण्यात आले. शरद पवार यांनी या निधीचे कागदपत्र आणि चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रयत संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी ट्विटरवर याबाबत  माहिती दिली आहे. “कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था, सातारा, या संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला. सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली”, असं शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नियमित बैठक होते. गेल्या वेळी विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी दोघांमध्ये बैठक झाली होती (Sharad Pawar meet Uddhav Thackery at Varsha Bungalow).

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी सादर केली होती. मात्र, राज्यपालांकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषयावरदेखील मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, दिवाळीनंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्याने आणखी कशाप्रकारे पुढे नेता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. राज्यातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरदेखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; प्रवीण दरेकरांची मागणी