मुख्यमंत्रिपदाची मागणी असेल, तर विचार करु : शरद पवार

अनिश बेंद्रे

| Edited By: |

Updated on: Nov 15, 2019 | 3:43 PM

माझ्या डोक्यात सध्या एकच गोष्ट येते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन! असा टोला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मुख्यमंत्रिपदाची मागणी असेल, तर विचार करु : शरद पवार

नागपूर : काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. वाटाघाटी प्राथमिक टप्प्यात आहेत. मुख्यमंत्रिपदाची मागणी कोणाची असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. नागपुरात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पवार गेले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar on Government formation) घेतली.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळणार असल्याचं वारंवार सांगितलेलं असताना शरद पवारांनी केलेलं वक्तव्य आश्चर्यचकित करणारं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचे विचार सरकारचा चालवताना धर्मनिरपेक्ष आहेत. याचा अर्थ आम्ही हिंदू, मुस्लिम अशा कुठल्या समाजाच्या विरोधात आहोत, असा होत नसल्याचं सांगत, हिंदुत्ववादाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कसं जुळवून घेणार, हा प्रश्न पवारांनी खोडून काढला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा झाली. मी त्या बैठकांना उपस्थित नसल्यामुळे मला तपशीलवार माहिती नाही. किमान सामायिक धोरणावर चर्चा सुरु आहे. सर्वमान्यता झाल्यानंतरच आराखडा करण्यात येईल, असं पवारांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल दिल्लीहून आले होते. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. दोन-तीन दिवसांनी पुन्हा दिल्लीला बैठक घेण्याचं त्यांनी सांगितलं, असंही पवार म्हणाले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रितपणे राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याचं मला माहिती नाही, मात्र राष्ट्रवादीकडून उद्याची वेळ मागण्यात आली आहे, असंही पवार म्हणाले.

भाजपसोबत राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे का?, शरद पवार म्हणतात….

माझ्या डोक्यात सध्या एकच गोष्ट येते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन! असा टोला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फडणवीस ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत, हे माहित नव्हतं, अशा कानपिचक्याही त्यांना लगावल्या. मी क्रिकेट प्रशासक आहे, प्रत्यक्ष खेळत नाही, असं म्हणत गडकरींच्या वक्तव्यावर भाष्य करणं पवारांनी टाळलं.

महासेनाआघाडीचं हे सरकार पाच वर्षे चालणार, मध्यावधी निवडणूक होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  जनतेनं बहुमत दिलं असतं तर अशी चर्चेची वेळ आली नसती. सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु आहे, असं शरद पवार (Sharad Pawar on Government formation) म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI