शिवसेनेनंतर अकाली दलही ‘एनडीए’बाहेर पडण्याच्या तयारीत, काँग्रेससोबत दिल्लीत आंदोलनाचा इशारा

| Updated on: Jun 25, 2020 | 12:06 PM

मंत्रिपद आणि भाजपसोबत आघाडी आमच्यासाठी शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोलाची नाही, असं शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले (Shiromani Akali Dal warns Modi Government to exit NDA)

शिवसेनेनंतर अकाली दलही एनडीएबाहेर पडण्याच्या तयारीत, काँग्रेससोबत दिल्लीत आंदोलनाचा इशारा
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेनेनंतर भाजपचा जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दलही ‘एनडीए’ला धक्का देण्याच्या तयारीत आहे. अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी शेतकरी आणि इंधनाच्या वाढत्या दरावरुन मोदी सरकारला घेरले आहे. मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय लोकशाही दलातून बाहेर पडण्याचा इशारा बादल यांनी दिला आहे. (Shiromani Akali Dal warns Modi Government to exit NDA)

मंत्रिपद आणि आघाडी ही आमच्यासाठी शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोलाची नाही. आम्ही त्याग करु शकतो, असं शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले. अकाली दलाच्या लोकसभेत दोन, तर राज्यसभेत तीन जागा आहेत. पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना नोव्हेंबर महिन्यात शिवसेना ‘एनडीए’बाहेर पडली होती.

डिझेलच्या वाढत्या किमतींबद्दल सुखबीर सिंह बादल म्हणाले की, “पंजाब सरकार (काँग्रेस) डिझेलवरील दहा रुपयांची किंमत कमी करण्यास तयार असेल, तर पंजाबमधील सर्व राजकीय पक्षांसह दिल्लीत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाला बसण्यास आम्ही तयार आहेत.”

हेही वाचा : एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत

“पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने 18 दिवसांत देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. धान पेरणीसाठी कामगार शुल्कामध्ये झालेल्या वाढीमुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. आता डिझेलच्या दरातील वाढीचा त्यांच्यावर मोठा परिणाम होईल, म्हणून केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करायला हवा” असं सुखबीर सिंह बादल म्हणाले

कृषी अध्यादेशातील पिकांच्या किमान आधारभूत मूल्याच्या मुद्द्यावर सुखबीर सिंह म्हणाले की, “जर केंद्र सरकारने आश्वासन देऊनही एमएसपी आणि खरेदीचे आश्वासन पाळले नाही, तर अकाली दल ना आघाडीची तमा बाळगेल, ना सरकारमधील भागीदारीची. अकाली दल कोणत्याही त्यागासाठी तयार आहे. आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही.” असा इशारा सुखबीर सिंह बादल यांनी दिला.

यापूर्वीही अकाली दलानेही नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भाजपवर ताशेरे ओढले होते. मुस्लिमांनाही सीएएमध्ये सामील करावे, अशी मागणी पक्षाने केली होती. यानंतर अकाली दलाने दिल्ली विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. 20 जानेवारी रोजी भाजपने दिल्ली निवडणुकीसाठी अकाली दलाबरोबरची आघाडी संपुष्टात आणली. (Shiromani Akali Dal warns Modi Government to exit NDA)