सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे आणि ती खदखद आता उघडपणे बाहेर येत आहे. सांगोला तालुक्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनीही ही नाराजी व्यासपीठावर उघड केली आहे, घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणत, शहाजी पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी माढा मतदार संघातील इतर नेत्यांचेही नुकसान झाल्याचे बोलून दाखवले आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहाजी पाटील दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्याविरूद्ध सांगोल्यातून निवडणूक लढवत होते, मात्र त्यांना यश मिळत नव्हते, यावेळी निवडणुकीआधीच गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीत निवृत्ती जाहीर केल्याने त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली, मात्र यावेळी शहाजी पाटलांनी थोडक्या मतांनी का होईना विजय खेचून आणला, इतकी वर्षे संघर्ष करून आमदार झालेल्या पाटलांना शिवसेनेत गेल्यावर तर मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र ती यावेळीही अधुरीच राहिली.