बेधडक स्वभाव, शिवसेनेचं तरुण नेतृत्त्व, जाणून घ्या कोण आहेत ओमराजे निंबाळकर?

MP Omraje Nimbalkar | वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी नवखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करुन दाखवली. त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले.

बेधडक स्वभाव, शिवसेनेचं तरुण नेतृत्त्व, जाणून घ्या कोण आहेत ओमराजे निंबाळकर?
ओमराजे निंबाळकर, शिवसेना खासदार

मुंबई: उस्मानाबादच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील ही दोन घराणी कायम चर्चेत राहिली. यापैकी निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे निंबाळकर हे सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजीतसिंह पाटील यांचा पराभव केला होता.

कोण आहेत ओमराजे निंबाळकर?

ओमराजे निंबाळकर यांचा जन्म 17 जुलै 1982 रोजी झाला. पवनराजे आणि आनंदीदेवी निंबाळकर हे त्यांचे पालक होत. ओमराजे निंबाळकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबादमध्येच झाले. पुढील शिक्षणासाठी ते लातूरला गेले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ओमराजे निंबाळकर यांनी पुणे गाठले. मात्र, त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ते पुन्हा उस्मानाबादेत परतले होते.

ओमराजे निंबाळकर यांचा राजकीय प्रवास

तरुणपणी ओमराजे निंबाळकर यांचा राजकारणात अजिबात रस नव्हता. मात्र, 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी नवखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करुन दाखवली. त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले.
वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषेदत सत्तापालट केला. ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉ. पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता.

2009 मध्ये आघाडी सरकार असल्याने उस्मानाबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी सहजपणे बाजी मारली.

राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राणा जगजितसिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी या पराभवाची परतफेड केली होती.

भरसभेत चाकू हल्ल्याचा प्रयत्न

2019 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात सभेच्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला मात्र ओमराजे यांनी हातावर वार झेलल्याने थोडक्यात निभावलं. ओमराजे निंबाळकर यांच्याशी हात मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी ओमराजे निंबाळकर यांच्या जवळ आला. नमस्कार करत त्याने ओमराजेंचा हात हातात घेतला. दुसऱ्या हाताने चाकू काढून पोटात खुपसण्यासाठी उगारला, मात्र ओमराजे यांनी हातावर वार झेलला. यामध्ये निंबाळकरांच्या हातातील घड्याळ तुटलं आणि त्यांच्या हाताला जखम झाली होती.

समर्थकाच्या प्रचारासाठी बाईकवरुन प्रवास

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातुन शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील यांना उमेदावारी मिळाली होती. त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी बाईकवरुन गावोगावी फिरून प्रचार केला होता.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI