नवी दिल्ली: शिवसेनेच्या मागे लागलेलं संकट अजून काही कमी होताना दिसत नाही. शिवसेनेतून आमदार आणि खासदार फुटल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्रं दिलं आहे. तसेच आपलीच शिवसेना (shivsena) ओरिजीनल असून आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं द्यावं, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगानेही शिवसेनेला नोटीस बजावल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाला एवढी कशाची घाई लागली आहे, असा सवाल शिवसेनेच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी केला आहे.