पक्षांतराची शिवसेनेलाही झळ, रत्नागिरीतील माजी आमदार भाजपच्या वाटेवर

पक्षांतराची झळ सत्ताधारी शिवसेनेलाही बसणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे दापोलीतील (Dapoli) नेते आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी (Suyakant Dalvi) भाजपच्या वाटेवर आहेत.

पक्षांतराची शिवसेनेलाही झळ, रत्नागिरीतील माजी आमदार भाजपच्या वाटेवर

रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांतर करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेची (BJP – Shivsena) वाट धरली. त्यामुळे विरोधक अगदीच बेजार झाले. मात्र, आता या पक्षांतराची झळ सत्ताधारी शिवसेनेलाही बसणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे दापोलीतील (Dapoli) नेते आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी (Suyakant Dalvi) भाजपच्या वाटेवर आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आणि सुर्यकांत दळवी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने दळवींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर दळवींच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दळवी भाजपमध्ये गेल्यास याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. दापोलीमध्ये सुर्यकांत दळवींचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ते कुणाला मदत करणार यावर दापोलीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

सुर्यकांत दळवींनी मंगळवारी (17 सप्टेंबर) आपल्या समर्थकांसह रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना सुर्यकांत दळवी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली. माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. मुख्यमंत्र्यांनी लवकरच मला बोलावून चर्चा करण्याचे आणि यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.”

शिवसेना पक्षप्रमुखांकडेही न्याय मागितला आहे : सुर्यकांत दळवी

आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही न्याय मागितला आहे. मात्र, पक्षाने दखलच घेतली नाही, तर मला माझा निर्णय घेणं भाग पडेल, असंही सुर्यकांत दळवींनी स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब हयात नसल्यामुळे माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय, असाही आरोप दळवींनी यावेळी केला. तसेच निर्णय घ्यायची वेळ आलीच, तर भाजपमध्ये जाईन, असा इशाराही दळवींनी पक्षश्रेष्ठींना दिला.

Published On - 10:59 am, Wed, 18 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI