शिवाजीराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या जमातीने, मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटले, राऊतांचा भाजपवर हल्ला

बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे, असं सांगताना एक निवडणूक हरलो म्हणून लढा संपत नाही. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल, असंही राऊत म्हणालेत.

शिवाजीराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या जमातीने, मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटले, राऊतांचा भाजपवर हल्ला
संजय राऊत

मुंबई : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. या विजयानंतर भाजपने आनंद व्यक्त केला. पण मराठी माणसाच्या पराभवानंतर आनंद व्यक्त करणारी तीच जमात आहे जी शिवाजी महाराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करत होती, असा संदर्भ देत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप पुढाऱ्यांवर आजच्या सामना अग्रलेखातून हल्ला चढवला आहे.

“औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील”, अशा शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

“बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे, असं सांगताना एक निवडणूक हरलो म्हणून लढा संपत नाही. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल”, असंही राऊत म्हणालेत.

बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्यावर भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटले, हे दु:ख टोचणारे

मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱ्हाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱ्हाटी भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला.

पाकिस्तान जिंकल्यावर पूर्वी भेंडी बाजारात फटाके फुटायचे, तेच कृत्य काल घडलं

मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे.

घाईघाईने निवडणुकीचा कार्यक्रम उरकून घेतला

कानडी राज्यकर्त्यांनी बेळगाव महापालिकेवचा भगवा जोरजबरदस्तीने तर उतरवलाच, पण मराठी माणसांचे बहुमत असलेली महापालिकाही सूडाने बरखास्त केली. त्यानंतर आठ वर्षे महापालिकेवर प्रशासक नेमून राज्य करण्यात आले व आताही मराठी एकजुटीची कोंडी करण्यासाठी कोरोना काळात घाईघाईने निवडणुकीचा कार्यक्रम उरकून घेतला. एकीकरण समितीने वॉर्ड रचनेवर आक्षेप घेतला, म्हणजे मराठी लोकवस्तीचे बालेकिल्ले असे काही फोडले की मराठी एकजुटीचा विजय होऊच नये.

कर्नाटक प्रशासनाने निवडणूक जोरजबरदस्तीने रेटून नेली

प्रचारात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. अनेक बुथवर ईव्हीएममधून कागदी स्लिपच बाहेर येत नव्हती. हे सर्व समोर आणूनही कर्नाटक प्रशासनाने निवडणूक जोरजबरदस्तीने रेटून नेली व मराठी माणसांचा पराभव घडवून आणला. भाजपास पूर्ण बहुमत मिळाले व महाराष्ट्र एकीकरण समितीस पाच जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा आनंद महाराष्ट्राला होऊच शकत नाही. बेळगाव महानगरपालिकेवरील भगवा उतरवून पालिका बरखास्त केली तेव्हा साधा निषेधही न करणारे भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी आज ‘भगवा फडकला हो…..’ म्हणून हर्षवायूने बेभान होत गोडधोड वाटत फिरत असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा तो अपमान आहे.

एकीकरण समितीचा पराभव व्हावा म्हणून भाजपची कुमक बेळगावात होती

लोकसभा पोटनिवडणुकीत एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना सवा लाख मते मिळाली होती. हे लक्षण चांगलेच होते, पण एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव घडावा यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची कुमक बेळगावात डेरेदाखल झाली होती. त्यामुळे आज बेळगावातील मराठीजनांच्या पराभवाबद्दल येथील भाजपचे पुढारी बेभान झाले याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

बेळगावात निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कधी लढली नाही

अखंड महाराष्ट्राबाबत यांना आस्था नव्हती आणि नाहीच. बेळगावात शिवसेना कधीच लढली नाही. सीमा आंदोलनात सहभागी असलेले शरद पवारही कधी बेळगाव निवडणुकीच्या आखाड्यात उतरले नाहीत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारीही कधी सीमा बांधवांशी बेईमानी करताना आढळले नाहीत. प्रत्येकाने आपापल्या परीने सीमाभागातील मराठी बांधवांना बळ देण्याचेच प्रयत्न केले, पण बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांची ती एकजूट आज उरली आहे काय?

बेळगावात मराठी माणसाच्या पराभवाने शिवसेना आणि महाराष्ट्राची जनता अस्वस्थ

एक निवडणूक हरले म्हणून लढा संपत नाही. जेथे भाषा, संस्कृती व अस्मितेचा प्रश्न येतो तेथे मराठी माणूस वाघाच्या काळजाने लढतच असतो. शिवसेनेने बेळगावच्या लढ्यासाठी 69 हुतात्म्यांची आहुती दिलीच आहे. शिवसेनाप्रमुखांनी या कार्यासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगला, म्हणूनच बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे.

त्याच प्रवृत्तीच्या लोकांनी काल पेढे वाटले

शिवरायांच्या काळात सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे हे निपजले होतेच. औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील.

मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल!

सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!

(Shivsena Sanjay Raut Attacked BJP Over Belgaum municipal Election)

हे ही वाचा :

Belgaum Municipal Election Results 2021 Live : बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI