ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं, राऊत भडकले, म्हणाले, ‘ज्यांना इतिहास घडवता नाही ती माणसं इतिहास पुसतात’

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 6:56 AM

भारतीय स्वातंत्र्याचे सध्या 75 वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' (ICHR) या संस्थेने 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले.

ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं, राऊत भडकले, म्हणाले, 'ज्यांना इतिहास घडवता नाही ती माणसं इतिहास पुसतात'
संजय राऊत, जवाहरलाल नेहरु आणि नरेंद्र मोदी
Follow us

मुंबई : भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकमधून केंद्र सरकार पर्यायाने मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. इतिहास पुसणे हे शौर्य नाही, असा शाब्दिक वार करताना, ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची ‘रीत’ आहे, असा टोमणाही सामना रोखठोकमधून लगावण्यात आला आहे.ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं, राऊत भडकले, ‘ज्यांना इतिहास घडवता नाही ती माणसं इतिहास पुसतात’

राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भाजपचं भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचं स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधलाय.

केंद्र सरकारने पुन्हा कोत्या मनाचे दर्शन घडवले!

भारतीय स्वातंत्र्याचे सध्या 75 वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले.

या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरु व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरु, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले.

मतभेद असू शकतात म्हणून काय राजकीय द्वेषापायी इतिहासच पुसून टाकायचा?

ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरुंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे.

इतिहास म्हणजे काय?

स्वातंत्र्य लढा हा आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे मनुष्याच्या प्रगतीची व दोषांची नोंद असते. इतिहास म्हणजे त्या त्या कालखंडातील त्या त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विचारांचे, आशा- आकांक्षांचे, घडामोडींचे आणि स्थितीचे प्रतिबिंब असते. त्या घटनांचे, घडामोडींचे, विचारप्रवाहांचे ते एक प्रकारचे विवेचन असते. थोडक्यात, इतिहास हे मानवी समाजाचे एक अखंड, अभंग आणि अविभाज्य छायाचित्रच असते. त्या छायाचित्रांतून पंडित नेहरूंना वगळून कोणाला काय साध्य करायचे आहे?

अमर इतिहास वगळून काय साध्य होणार?

विद्यमान मोदी सरकारचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींशी राजकीय भांडण असायला हरकत नाही. सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱया ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला, पण पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य लढय़ातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान हा अमर इतिहास आहे. तो नष्ट करून काय साध्य होणार?

नेहरुंचं चित्र वगळणाऱ्या ICHR ने हे पुस्तक नजरेखालून घातले पाहिजे

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेहरुंनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. ‘भारत छोडो’ आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जनसंघाचे संस्थापक कुठेच नव्हते. नेहरू, पटेल या आंदोलनात तुरुंगात गेले. या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पुस्तक ‘काँग्रेस रेडिओ’ असे प्रसिद्ध झाले. उषा ठक्कर त्याच्या लेखिका आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातून नेहरुंचं चित्र वगळणाऱ्या ICHR ने हे पुस्तक नजरेखालून घातले पाहिजे.

इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात काही विशेष व्यक्ती जन्माला येतात आणि आपल्या विचारांनी जगाला एका नवीन विचारप्रवाहात ओढून नेतात. नेहरू हेदेखील असेच व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या विचारांतून शांततेचा संदेश देताना ‘जगा व जगू द्या’ हे तत्त्व सर्वांनी स्वीकारावे असा आग्रह धरला. श्रीमंत व माजोरड्या राष्ट्रांच्या तुलनेत गरीब, मागास व दुर्बल राष्ट्रांचा एक गट तयार केला, त्यांना एकतेच्या भावनेने बांधले. नेहरूंचा द्वेष करावा असे त्यांच्याकडून काय घडले? उलट नेहरूंनी निर्माण केलेल्या संस्था, सार्वजनिक उपक्रम विकून देशाचा आर्थिक गाडा चालवला जात आहे.

(Shivsena Sanjay Raut Slam Modi GOVT BJP Over Indian Council of Historical Research remove photo of pandit javaharlal nehru)

हे ही वाचा :

भाजप पाठोपाठ शिवसेनेचा राष्ट्रवादीलाही दणका, रत्नागिरीच्या शहराध्यक्षाने बांधलं हाती शिवबंधन

‘मी सरसेनापती हंबिरराव मोहितेंचा वंशज, असल्या धमक्यांना जनताच उत्तर देईल’, आमदार मोहितेंचं राऊतांना प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI