शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप; विरोधी पक्षांची टीका काय?
यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. पहिल्यांदाच भायखळा विधानसभेमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
Yamini Jadhav Distribute Of Burqas : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे.
मुंबईच्या भायखळा विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या बॅनरला आणि कार्यक्रमाला पाहून विरोधी पक्षाने शिवसेनेवर संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सध्या सर्वच पक्ष दलित आणि मुस्लिम वोट बँक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा भाजप आणि शिवसेनेला स्पष्टपणे बसल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता यामिनी जाधव यांनी आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला खेचण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पहिल्यांदाच भायखळा विधानसभेमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी हजेरी लावावी, अशा आशय या बॅनरवर पाहायला मिळत आहे.
अरविंद सावंत यांना सर्वात जास्त मुस्लिम मतदान
यामिनी जाधव यांचा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी 50 हजाराहून जास्त मतांनी पराभव केला. त्यांना या विभागातून सर्वात जास्त मुस्लिम मतदान मिळालं. यामिनी जाधव जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होत्या. त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. तेव्हा 50 हजाराहून जास्त मताधिक्याने त्यांनी काँग्रेसच्या मधु चव्हाण यांचा पराभव केला होता. मधु चव्हाण यांना 250000 मतं मिळाली होती. मात्र आता समीकरण बदलला आहे.
त्यामुळे यामिनी जाधव आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी आता पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेवर संधी साधू राजकारण केल्याचा गंभीर आरोप होत आहे.