अक्कल गुडघ्यात ठेवली की मग…उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा जोरदार हल्लाबोल
"जयकुमार गोरे यांनी जी विधाने केलेली आहेत, त्यासाठी पण मी खासदार आहे म्हणून तोंडावरती संयम ठेवतो. पण अशा स्वरूपात जर ते मतदारांची लायकी काढत असतील तर लाडक्या बहिणींनी विचार करावा की त्यांच्या नवऱ्याची काय किंमत हे सरकार करत आहे"

नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवनमधील झाडं तोडण्याच्या मुद्यावरुन राजकारण तापत चाललं आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. आज प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनमध्ये जाऊन एकही झाड तोडू देणार नाही असं निक्षून सांगितलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी झाडं तोडण्याच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “साधुसंत तुकारामांची आठवण येते का? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पण इथे तर वृक्ष, निसर्ग, जंगल यांची किंमतच उरलेली नाही. कालच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं, अक्कल गुडघ्यात ठेवली की मग कसं कळणार?” अशा शब्दात अरविंद सावंत यांनी टीका केली.
“देशाचा व्यापार, बाजार, पैसे… एवढंच का दिसतं? बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची काय गरज? आधी कधी असे प्रकार झाले होते का? मुंबईकडे इतक्या उजाड जागा आहेत, खाजगी शेतकऱ्यांची जमीन आहे, त्यांना भाडं द्या,वापरा. पण ते न करता थेट जंगलांवर कुरघोडी”अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
ते जंगल जगातील एकमेव शहरी दाट जंगलं
“उद्धवजींनी आठवत असेल, तर मुंबई मेट्रोच्या टर्मिन्ससाठी गोरेगावच्या जंगलावर जेव्हा प्रकल्प आणला होता, तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला. कारण ते जंगल जगातील एकमेव शहरी दाट जंगलं आहे. उलट त्यांनी त्या जंगलाचा विस्तार केला,वन्यप्राण्यांचं संरक्षण केलं. त्यांनी फक्त विरोध केला नाही, तर पर्यायही दिला. ही सगळी परिस्थिती पाहता, निसर्गाचं नुकसान थांबवणं आणि योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तपोवन मधील एकही झाड आम्ही तोडू देणार नाही, प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू” असं अरविंद सावंत म्हणाले.
मी खासदार आहे म्हणून तोंडावरती संयम ठेवतो
“निवडणूक आयोग हे लंगडं, बहिरं, आंधळं मुख आणि लुळापांगळा झालाय. इतक्या तक्रारी करून इतके व्हिडिओ बनवून सुद्धा साधी एक नोटीस सुद्धा ते पाठवू शकत नाहीत तर निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतो हे तुम्हीच पहावं. खरंतर जयकुमार गोरे यांनी जी विधाने केलेली आहेत, त्यासाठी पण मी खासदार आहे म्हणून तोंडावरती संयम ठेवतो. पण अशा स्वरूपात जर ते मतदारांची लायकी काढत असतील तर लाडक्या बहिणींनी विचार करावा की त्यांच्या नवऱ्याची काय किंमत हे सरकार करत आहे” अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
