तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, मग पवारांचं मत कमळाला कसं गेलं? : सुभाष देशमुख

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्यावरुन भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टीकास्त्र सोडलं. घड्याळासमोरचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत जात असल्याचं मी स्वत: पाहिल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावर सुभाष देशमुखांनी त्यांना टोमणा लगावला. पवारांनी जिथे मतदान केलं, तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, तिथे शिवसेनेचा उमेदवार होता, मग कमळाला मत कसं …

तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, मग पवारांचं मत कमळाला कसं गेलं? : सुभाष देशमुख

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्यावरुन भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टीकास्त्र सोडलं. घड्याळासमोरचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत जात असल्याचं मी स्वत: पाहिल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावर सुभाष देशमुखांनी त्यांना टोमणा लगावला. पवारांनी जिथे मतदान केलं, तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, तिथे शिवसेनेचा उमेदवार होता, मग कमळाला मत कसं गेलं, असा प्रश्न सुभाष देशमुख यांनी केला.

सुभाष देशमुख म्हणाले, “शरद पवार हे गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. त्यांना राजकारणातील सर्व गोष्टी ज्ञात आहेत. आता त्यांना विजय आणि पराभवाची चाहूल लागली असेल. पराभवाला सामोरे जात असल्यामुळे अगोदर सांगायचे मशीन खराब आहे, आता म्हणतात बटण दाबले तर कमळाला मत जाते. खरे म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी मतदान केले, बहुतेक त्या ठिकाणी कमळ हे चिन्ह नव्हते”

यापूर्वी लोकांना जसे पाण्यात संताजी- धनाजी दिसायचे, तसेच पवारांना उठसूठ कमळ दिसू लागले आहे, असा टोला सुभाष देशमुख यांनी लगावला. पवारांना खात्री आहे आपला पराभव होणार आहे. त्या पराभवाच्या आधीची पार्श्वभूमी पवार तयार करीत आहेत, असं सुभाष देशमुख म्हणाले.

असं असलं तरी शरद पवार यांनी ईव्हीएमबाबतचं वक्तव्य हे गुजरात, हैदराबादचा संदर्भ देऊन केलं होतं. त्यामुळे सुभाष देशमुख यांनी पवारांचं वक्तव्य नीट ऐकलं नाही की काय असा प्रश्न आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

“ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. गुजरात आणि हैदराबादच्या काही लोकांनी माझ्यासमोर मशीन (EVM) ठेवली होती. त्यांनी मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं, पण तिथे मत भाजपला गेल्याचं मी स्वत: पाहिलं. सगळ्याच मशीनमध्ये असं असेल हे मी म्हणत नाही. हे मी पाहिलेलं सांगतो, त्यामुळे मी त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही कोर्टातही गेलो. 5 ऐवजी 50 मतं मोजण्याची मागणी केली. दुर्दैवाने कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही”, असं शरद पवार साताऱ्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

पवारांचं मतदान

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत 29 एप्रिलला मुंबईत मतदान केलं होतं. त्यांचं नाव मुंबईत आहे. त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे ना इथे राष्ट्रवादीचा उमेदवार होता ना भाजपचा. त्यामुळे शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेत, पवारांनी मतदान केलेल्या ठिकाणी भाजपचा उमेदवारच नव्हता असं प्रत्युत्तर दिलं. पण पवारांचं वक्तव्य मुंबईबाबतचं नव्हतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *