सुप्रिया सुळेंनी वयोवृद्धांना जेवण वाढलंही अन् पंगतीत जेवल्याही!

सुप्रिया सुळेंनी वयोवृद्धांना जेवण वाढलंही अन् पंगतीत जेवल्याही!

दौंड (पुणे) : सरकारकडून जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची असते. अनेकदा शासकीय योजना लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जनतेपर्यंत पोहोचतच नसल्याचं चित्र पहायला मिळतं. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र शासनानं ज्येष्ठ नागरीकांसाठी सुरु केलेली वयोश्री योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांना जेवण वाढत त्यांची विचारपूस केली. इतकंच नव्हे, तर पंगतीत बसून जेवणाचा आस्वादही घेतला. सुप्रिया सुळेंच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात दौंड तालुक्यातल्या गावोगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. या शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत सहभागी झालेल्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली.

सुप्रिया सुळे तेवढ्यावरच न थांबता त्यांनी शिबीरस्थळी असलेल्या भोजनालयात जावून ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीनं जेवणंही वाढलं. त्यानंतर त्या स्वतःही ज्येष्ठ नागरिकांसोबत जेवल्या आणि शिबिरार्थींसाठीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

एरवी शासकीय योजनांच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जाते. मात्र तरीही त्या योजना गरजू घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र दौंडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून गावोगावी जनजागृती करुन ज्येष्ठ नागरीकांना वयोश्री योजनेत सामावून घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आज झालेल्या तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनी या शिबिराला भेट देत ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली.

शासकीय योजना तळागाळात पोहोचवण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची असते. मात्र याबाबत अनेकदा उदासीनता पहायला मिळते. परंतु दौंडमध्ये चक्क खासदारांनीच ज्येष्ठ नागरिकांना जेवण वाढत, त्यांच्यासोबतच जेवणाचा आस्वाद घेतल्यानं चर्चेचा विषय ठरलाय. त्याचवेळी योजना यशस्वी करायची असेल, तर नागरिकांशी तितकीच आपुलकी असली पाहिजे असंही बोललं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI